Confusion over the SIR campaign; names of thousands of voters missing from the electoral rolls : २००२ च्या मतदार यादीवर आधारित पडताळणीमुळे संभ्रम; नव्याने नोंदणीची संधी कायम
Akola निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआरआर) मोहिमेदरम्यान अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात हजारो मतदारांची नावे मतदार यादीतून गहाळ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेतही अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
सध्या सुरू असलेल्या एसआरआर मोहिमेसाठी २००२ सालच्या मतदार यादीचा आधार घेण्यात आला आहे. त्यामुळे त्यानंतर झालेल्या लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदान केलेल्या अनेक मतदारांची नावेही या यादीत दिसत नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, अनेकांना पुन्हा मतदार नोंदणीची प्रक्रिया करावी लागत आहे.
याशिवाय जुन्या मतदार यादीत अनेक मतदारांची तसेच त्यांच्या आई-वडिलांची नावे अपूर्ण किंवा चुकीची असल्याने पडताळणीचे काम अधिकच गुंतागुंतीचे बनले आहे. काही नागरिकांना आवश्यक कागदपत्रे असूनही नोंदणी प्रक्रियेत अडचणी येत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
जिल्ह्यात एसआरआर मोहिमेसाठी १,७५,१५,६४४ मतदारांच्या पडताळणीचे नियोजन करण्यात आले असून, त्यासाठी १,७४१ बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) नियुक्त करण्यात आले आहेत. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत ही मोहीम राबविली जात आहे.
दरम्यान, अनेक ठिकाणी बीएलओ एकाच ठिकाणी बसून काम करत असल्याची तसेच नागरिकांकडूनच फॉर्म भरून घेतल्याची तक्रार आहे. काही बीएलओंना फॉर्म व्यवस्थित भरता येत नसल्याने चुकीची माहिती नोंदविली जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. त्यामुळे प्रशासनाने बीएलओंना अधिक प्रभावी प्रशिक्षण देण्याची मागणी होत आहे.
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, २००२ च्या यादीत नाव नसले तरी संबंधित नागरिक मतदार म्हणून नव्याने नोंदणी करू शकतात. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केल्यानंतर पडताळणी पूर्ण होऊन पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.








