व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Sandip Joshi : राऊतांचा ‘रामरक्षा’ स्टंट; देवेंद्र फडणवीसांना हिंदुत्व शिकवणाऱ्यांना संदीप जोशींचे...

Sandip Joshi : राऊतांचा ‘रामरक्षा’ स्टंट; देवेंद्र फडणवीसांना हिंदुत्व शिकवणाऱ्यांना संदीप जोशींचे खुले पत्र!  

Sandeep Joshi says that trying to teach Hindutva to Devendra Fadnavis is nothing short of a political joke : फडणवीसांना हिंदुत्व शिकविण्याचा प्रयत्न म्हणजे निव्वळ राजकीय विनोद असल्याचा टोला

Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी पाठविलेल्या रामरक्षा पठणाच्या निमंत्रणावरून नागपुरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांनी संजय राऊतांवर ‘खुले पत्र’ लिहीत अत्यंत तिखट शब्दांत पलटवार केला आहे.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हिंदुत्व शिकविण्याचा प्रयत्न म्हणजे निव्वळ राजकीय विनोद आणि केविलवाणा स्टंट आहे,” असा घणाघात करत जोशी यांनी, “रामभक्तांना ‘हरामखोर’ म्हणणाऱ्यांना आता अचानक रामरक्षा आठवली आहे,” असा बोचरा टोला लगावला.

आपल्या पत्रातून संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाच्या बदलत्या राजकीय भूमिकांवर जोरदार निशाणा साधताना संदीप जोशी म्हणाले की, आयुष्यभर हिंदुत्व कृतीतून जगणाऱ्या आणि श्रीराम मंदिर उभारणीच्या लढ्यात कारसेवक म्हणून सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना रामभक्तीचे प्रमाणपत्र देण्याचा अधिकार संजय राऊतांना अजिबात नाही. हिंदुत्वावर उपदेश करण्यापूर्वी राऊतांनी सत्तेसाठी आपल्या पक्षाने किती वेळा विचारधारा बदलली, याचे आधी आत्मपरीक्षण करावे.

Cremation Ground in Every Village : स्मशानभूमीशिवाय विकासनिधी नाही; शासनाच्या निर्णयाने ३०६ गावांपुढे मोठे आव्हान

आमचे हिंदुत्व निवडणुकीपुरते जागे होत नाही की परिस्थितीनुसार रंग बदलत नाही. भगवा आमच्यासाठी केवळ झेंडा नसून तो आमचा विचार, संस्कार आणि जीवनपद्धती आहे, त्यामुळे आम्हाला आमच्या हिंदुत्वाच्या प्रदर्शनासाठी अशा नौटंकीची गरज नाही, असे त्यांनी पत्रात नमूद केले.संजय राऊत यांच्या निमंत्रणाचा समाचार घेताना जोशी यांनी त्यांच्या जुन्या वक्तव्यांची आठवण करून दिली.

“जय श्रीराम म्हणणाऱ्या रामभक्तांवर आक्षेपार्ह भाषा वापरणारे आज कोणत्या नैतिक अधिकाराने रामरक्षा पठणाचे निमंत्रण देत आहेत?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. श्रद्धा ही प्रसिद्धीची नौटंकी नसून ती आचरणात दिसली पाहिजे, असे सुनावत जोशी यांनी टोला लगावला की, आज रामाच्या सुरक्षेपेक्षा राऊतांना स्वतःच्या पक्षाच्या राजकीय अस्तित्वाची सुरक्षा करण्याची धडपड अधिक दिसते आहे. त्यामुळे हा उपक्रम रामभक्तीचा नसून केवळ राजकीय पुनर्वसनाचा केविलवाणा प्रयत्न आहे.

Neet paper leak : पेपरफुटीविरोधात खामगावात २१ जुलैला ‘शिक्षण बंद’; विद्यार्थी कृती समितीचा एल्गार

पत्राच्या शेवटी संदीप जोशी यांनी राऊतांना थेट आव्हान देत म्हटले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना रामरक्षा पठणाचे निमंत्रण देण्यापूर्वी, तुमच्या पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला रामरक्षा स्तोत्र व्यवस्थित म्हणता येते का, याची आधी खात्री करून घ्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुखात, मनात आणि आचरणात श्रीराम आहेत, त्यामुळे त्यांना रामभक्ती शिकविण्याचा निष्फळ प्रयत्न करू नका. स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या नावाचा वापर करणे बंद करा; कारण महाराष्ट्रातील जनता आता दिखाऊ आणि खऱ्या हिंदुत्वातील फरक चांगलीच ओळखून आहे, अशा कडक शब्दांत जोशी यांनी आपल्या पत्राचा समारोप केला आहे.

error: Content is protected !!