व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungatiwar : चंद्रपूर विकासाला बूस्टर! मुनगंटीवारांची मागणी अन् मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश

Sudhir Mungatiwar : चंद्रपूर विकासाला बूस्टर! मुनगंटीवारांची मागणी अन् मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश

Boost for Chandrapur’s Development! Chief Minister Issues Immediate Orders Following Mungantiwar’s Demand : चंद्रपूरला हवाई कनेक्टिव्हिटीचे बळ; मोरवा विमानतळ आधुनिकीकरणाला हिरवी झेंडी

Chandrapur : चंद्रपूरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या मोरवा विमानतळाच्या विस्तार व आधुनिकीकरणाच्या कामांना अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.

मोरवा विमानतळाची धावपट्टी वाढविणे, आधुनिक सुविधा उभारणे आणि भविष्यात नियमित हवाई सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक पायाभूत विकासकामे करण्याची मागणी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. मुंबई येथे झालेल्या भेटीत त्यांनी चंद्रपूरच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन विकासासाठी विमानतळ विस्ताराची गरज अधोरेखित केली.

चंद्रपूर हा खनिज संपत्ती, ऊर्जा उत्पादन, सिमेंट आणि पोलाद उद्योगांसाठी राज्यातील महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे देश-विदेशातील पर्यटकांचे आकर्षण वाढत आहे. मात्र, विमानतळाच्या मर्यादित सुविधांमुळे जिल्ह्याच्या विकासाला अडथळे येत असल्याचा मुद्दा मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला होता.

Sudhir Mungatiwar : विक्रमवीर मुनगंटीवार करणार विधानसभेत दमदार बॅटिंग

सध्या मोरवा विमानतळाची धावपट्टी सुमारे ९०० मीटर लांबीची असून ती मोठ्या प्रवासी विमानांसाठी अपुरी आहे. त्यामुळे धावपट्टी विस्तार, डीजीसीए मानकांनुसार सुविधा निर्माण करणे आणि अन्य आवश्यक विकासकामे हाती घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली होती.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावाची तातडीने दखल घेत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना पुढील कार्यवाहीचे निर्देश दिल्याने प्रकल्पाच्या हालचालींना वेग येणार आहे. या प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्यात उद्योग, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!