Vision to Action for Chandrapur; sudhir Mungantiwar’s Bengaluru Visit Set to Be a Game Changer :बल्लारपूरच्या टिंबर संग्रहालय–झायलेरियम प्रकल्पासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि रोजगारनिर्मितीच्या संधींचा अभ्यास
Chandrapur : केवळ संकल्पना मांडून न थांबता त्या प्रत्यक्षात उतरविण्याच्या भूमिकेतून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या विकासासाठी आता ‘व्हिजन टू ॲक्शन’ची दिशा स्वीकारली आहे. बल्लारपूर येथे उभारण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी टिंबर संग्रहालय–झायलेरियम प्रकल्पाला जागतिक दर्जाची दिशा देण्यासाठी त्यांचा बंगळुरू येथील अभ्यास दौरा सध्या सुरू असून, हा दौरा चंद्रपूरच्या वनाधारित उद्योग, संशोधन आणि स्थानिक रोजगारनिर्मितीसाठी गेमचेंजर ठरण्याची चिन्हे आहेत.
राज्याच्या अर्थसंकल्पात सुमारे १५० कोटी रुपयांच्या टिंबर संग्रहालय–झायलेरियम प्रकल्पाला मंजुरी मिळवून देण्यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विधानसभेत अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून विषय प्रभावीपणे मांडत शासनस्तरावर अनेक बैठका घेऊन या प्रकल्पासाठी आवश्यक पाठबळ उभे केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रत्यक्ष गती मिळाली.
याच पार्श्वभूमीवर बंगळुरू येथील लाकूड विज्ञान व तंत्रज्ञान संस्था तसेच भारतीय प्लायवुड औद्योगिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा अभ्यास दौरा सुरू आहे. या दौऱ्यात टिंबर संग्रहालय–झायलेरियम, लाकूड आधारित उद्योग, अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्य विकास आणि स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मितीच्या नव्या संधींवर सखोल चर्चा करण्यात आली.
या भेटीदरम्यान संस्थेतील शास्त्रज्ञांनी लाकूड आधारित विविध उत्पादनांचे संशोधनात्मक सादरीकरण केले. तसेच बल्लारपूर येथे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी तांत्रिक मार्गदर्शन आणि संकल्पनात्मक सहकार्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. आ. मुनगंटीवार यांनी प्रगत लाकूड प्रक्रिया केंद्रे, आधुनिक संशोधन प्रकल्प आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी आधारित माहिती तंत्रज्ञान प्रणालींची पाहणी करून अशाच धर्तीवरील नाविन्यपूर्ण मॉडेल बल्लारपूरमध्ये विकसित करण्याच्या सूचनाही दिल्या.
चंद्रपूरच्या सागवानाचा वापर अयोध्येतील श्रीराम मंदिर, नवीन संसद भवन, भारत मंडपम आणि अन्य राष्ट्रीय महत्त्वाच्या वास्तूंमध्ये झाला आहे. या ऐतिहासिक वारशाला आधुनिक संशोधन आणि तंत्रज्ञानाची जोड देत जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या दिशेने टिंबर संग्रहालय–झायलेरियम प्रकल्प महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीतून सुरू झालेला हा ‘व्हिजन टू ॲक्शन’ प्रवास चंद्रपूरच्या विकासाला केवळ नवी दिशा देणारा नाही, तर वनाधारित उद्योग, पर्यटन आणि स्थानिक रोजगारनिर्मितीचा नवा अध्याय लिहिणारा ठरणार असल्याचे बोलले जात आहे.








