tvk-vijay-tamil-nadu-government-formation-governor-condition-bjp-aiadmk-political-twist : भाजपच्या हालचालींमुळे एआयएडीएमकेमध्ये खळबळ
Chennai : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक पक्षांना मोठा धक्का देत अभिनेता थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम पक्षाने राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदय घेतला असला तरी सत्तास्थापनेचा मार्ग मात्र अजूनही कठीण बनला आहे. सर्वाधिक १०८ जागा जिंकूनही विजय यांना अद्याप सरकार स्थापन करता आलेले नाही. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी बहुमतासाठी आवश्यक असणाऱ्या ११८ आमदारांच्या पाठिंब्याची पत्रे सादर केल्याशिवाय मुख्यमंत्रिपदाची शपथ देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने टीव्हीकेसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.
विजय यांनी सलग दुसऱ्या दिवशी राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपालांनी पुन्हा एकदा त्यांच्यासमोर तीच अट ठेवली. स्थिर सरकार देणे ही घटनात्मक जबाबदारी असल्याचे सांगत बहुमत सिद्ध केल्यानंतरच शपथविधी होईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी उत्सुक असलेल्या टीव्हीकेला रिकाम्या हाती परतावे लागले आहे.
West bengal politics : सुवेंदु अधिकारी यांच्या पीएच्या हत्येमुळे बंगाल हादरला!
राज्यपालांच्या भूमिकेमुळे टीव्हीकेने चेन्नईतील नेहरू स्टेडियमवर केलेले शपथविधीचे नियोजनही कोलमडले. विजय यांच्या समर्थकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून काही कार्यकर्त्यांनी राजभवनाबाहेर निषेध प्रदर्शन केले. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात मोठ्या बदलाची अपेक्षा असलेल्या टीव्हीके कार्यकर्त्यांचा या घडामोडींमुळे हिरमोड झाल्याचे दिसून आले.
तामिळनाडू विधानसभेतील सध्याच्या आकडेवारीनुसार, २३४ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी ११८ आमदारांची आवश्यकता आहे. टीव्हीकेकडे १०८ आमदार असून काँग्रेसच्या पाच आमदारांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे त्यांचे एकत्रित संख्याबळ ११३ वर पोहोचले आहे. मात्र, बहुमतासाठी अजूनही पाच आमदारांची कमतरता आहे. त्यात विजय हे दोन मतदारसंघांतून विजयी झाल्याने प्रत्यक्ष प्रभावी संख्याबळावरही चर्चा सुरू झाली आहे.
Sanghatan Srujan Abhiyan : संघटन सृजन अभियानानंतरही नेतृत्व निवडीला विलंब
दरम्यान, तामिळनाडूच्या राजकारणात भाजपने केलेल्या हालचालींमुळे सत्तासमीकरणांना आणखी वेग आला आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर टीव्हीकेची सत्ता स्थापन होऊ नये, अशी भाजपची रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे भाजपकडून अण्णाद्रमुकवर टीव्हीकेसोबत जाण्यासाठी दबाव वाढवला जात असल्याचे बोलले जात आहे. भाजपला दक्षिणेत काँग्रेसला पुन्हा बळ मिळू नये, अशी भूमिका असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर अण्णाद्रमुकमध्येही अंतर्गत मतभेद वाढल्याचे चित्र समोर आले आहे. पक्षातील काही नेते विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे, तर काही नेते या युतीला ठाम विरोध करत आहेत. त्यामुळे अण्णाद्रमुकमध्ये फुटीची शक्यताही व्यक्त केली जात आहे. भाजपच्या मध्यस्थीमुळे तामिळनाडूतील राजकीय समीकरणे नव्या वळणावर गेली असून आगामी काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
Har Ghar Nal Scheme : २१ गावांचा टँकरवर जीव; ‘हर घर नल’ योजनेचे स्वप्न कागदावरच?
तामिळनाडू विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता टीव्हीकेकडे १०८, द्रमुककडे ५९, अण्णाद्रमुककडे ४७, काँग्रेसकडे ५ आणि इतरांकडे ८ जागा आहेत. त्यामुळे उर्वरित आमदारांचा पाठिंबा कोणाला मिळतो, यावर राज्यातील पुढील सरकारचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. विजय यांना सत्ता स्थापनेसाठी आणखी काही आमदारांचा पाठिंबा मिळवण्यात यश येते की तामिळनाडूत राजकीय अनिश्चितता आणखी वाढते, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
__








