व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uddhav Thackeray : नेतृत्वावर विश्वास नसेल तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार’

Uddhav Thackeray : नेतृत्वावर विश्वास नसेल तर शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार’

uddhav-thackeray-offers-to-step-down-as-shivsena-chief-at-60th-foundation-day-event : उद्धव ठाकरेंचा भावनिक ‘बॉम्ब’, मोठ्या संघटनात्मक बदलांचे संकेत

Mumbai  : शिवसेना स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आपल्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारी दर्शवत भावनिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण संदेश दिला. त्यामुळे ठाकरे गटात आगामी काळात मोठे संघटनात्मक बदल होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मुंबईतील षणमुखानंद सभागृहात पार पडलेल्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे गट आणि पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर जोरदार टीका केली. मात्र भाषणाच्या शेवटी त्यांनी केलेल्या वक्तव्याने उपस्थित शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले.

“माझ्या नेतृत्वावर होत असलेले आरोप जर तुम्हाला खरे वाटत असतील, तर मी या क्षणी शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे. माझ्या जागी एखाद्या सामान्य शिवसैनिकाला बसवा. मला नेतृत्वाची हाव नाही,” असे सांगत उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसमोर भावनिक आवाहन केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहातील शिवसैनिकांनी उभे राहून जोरदार घोषणाबाजी करत प्रस्तावाला विरोध दर्शविला.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, पदासाठी राजकारण करण्याची त्यांची कधीच इच्छा नव्हती. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाही त्यांनी सत्तेला चिकटून राहण्याऐवजी जनतेचा कौल आणि नैतिकता महत्त्वाची मानली होती. गेली बारा ते तेरा वर्षे पक्षाचे नेतृत्व केल्यानंतर आता जर आपल्या नेतृत्वाबाबत शंका निर्माण होत असतील, तर त्याबाबत अंतिम निर्णय शिवसैनिकांनी घ्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी पक्षातील निष्ठा आणि गद्दारीचा मुद्दाही जोरदारपणे उपस्थित केला. लोकसभा निवडणुकीत सामान्य शिवसैनिक आणि शेतकऱ्यांनी केलेल्या योगदानाची आठवण करून देताना त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या खासदारांवर निशाणा साधला. धाराशिवमधील एका शेतकऱ्याने निवडणुकीसाठी मदत म्हणून स्वतःचा पैशांचा बटवा दिल्याचा प्रसंग सांगत ठाकरे म्हणाले की, अशा सामान्य लोकांच्या विश्वासावर निवडून आलेले लोक आज पक्ष सोडत असतील तर ते जनतेच्या विश्वासाशी केलेले पाप आहे.

इतिहासातील खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांचा संदर्भ देत त्यांनी गद्दारीचा शिक्का शतकानुशतके पुसला जात नसल्याचे सांगितले. पक्ष सोडणाऱ्या नेत्यांनाही जनतेसमोर उत्तर द्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

Anil Deshmukh: आधी स्वतःच्या मुलीच्या हातून ‘तुतारी’ काढून दाखवा; अनिल देशमुखांचे बाबा आत्रामांना जाहीर आव्हान

भाजपवर हल्लाबोल करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना तीस वर्षे भाजपसोबत राहिली; मात्र कधीही स्वतःचे अस्तित्व गमावले नाही. काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर टीका करत त्यांनी उलट महाराष्ट्रातील भाजपच शिंदे गटात विलीन होईल की काय, अशी उपरोधिक टिप्पणी केली. भाजपच्या अनेक खासदारांचा मूळ पक्ष वेगळा असल्याचा उल्लेख करत त्यांनी भाजपकडे विचारांची दिवाळखोरी असल्याचा आरोप केला.

लोकसभा निवडणुकीत मोदींची लाट असतानाही शिवसेनेचे नऊ खासदार निवडून आल्याचा दावा करत ठाकरे म्हणाले की, हा विजय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आणि शिवसैनिकांच्या निष्ठेचा होता. मात्र त्यानंतर खासदारांची फोडाफोड करून लोकशाहीचा अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना ठाकरे म्हणाले की, काही लोकांना सत्तेची आणि पदांची इतकी हाव होती की त्यांना पक्ष आणि विचारांपेक्षा स्वतःचे राजकीय भविष्य महत्त्वाचे वाटले. मातोश्रीने फक्त वाढायचे आणि इतरांनीच सर्व काही मिळवायचे, अशी मानसिकता असणाऱ्यांमुळेच पक्षाला मोठा धक्का बसल्याचे त्यांनी सूचित केले.

Nitin Raut: निवडणुकीच्या रणधुमाळीत निरीक्षक चीन दौऱ्यावर; काँग्रेसमध्ये नितीन राऊतांविरोधात संतापाचा ‘ब्लास्ट’!

देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबतही उद्धव ठाकरे यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. लोकशाहीवरील जनतेचा विश्वास कमी होत चालल्याचा दावा करत त्यांनी भाजपची वाटचाल ‘वन पार्टी, नो इलेक्शन’च्या दिशेने सुरू असल्याची टीका केली. देश अराजकाच्या दिशेने जात असल्याचा इशारा देतानाच लोकशाही संस्थांवर वाढत्या दबावाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.

वर्धापन दिनाच्या मंचावरून केलेले उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख पद सोडण्याचे वक्तव्य हे केवळ भावनिक आवाहन होते की संघटनात्मक पुनर्बांधणीचा संकेत, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर आणि अलीकडील राजकीय घडामोडींनंतर ठाकरे गट नव्या रणनीतीसह पुढे जाणार का, याचे उत्तर आगामी दिवसांत मिळणार आहे. मात्र एका वक्तव्याने उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू स्वतःकडे खेचल्याचे स्पष्ट झाले आहे.

error: Content is protected !!