Nitin Raut on China tour with family during legislative election: काँग्रेसमधील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर; जबाबदारी झटकल्याचा आरोप
Nagpur विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक आटोपली असली, तरी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षाने ज्यांच्यावर निवडणुकीचे ‘निरीक्षक’ म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती, ते ज्येष्ठ नेते व आमदार डॉ. नितीन राऊत ऐन मतदानाच्या काळात निवडणूक वाऱ्यावर सोडून कुटुंबासह चीन दौऱ्यावर निघून गेल्याने काँग्रेस वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पर्यटनालाच जायचे होते तर निरीक्षकाची जबाबदारी स्वीकारलीच कशाला? असा थेट सवाल आता काँग्रेसच्याच गोटातून विचारला जात असून, राऊत सध्या स्वपक्षियांच्याच ‘टार्गेट’वर आले आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांना रिंगणात उतरवले. लोंढे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यापासून ते रविभवन येथील बैठकीत माजी मंत्री सुनील केदार यांच्यासोबत रणनीती आखण्यापर्यंत नितीन राऊत अग्रभागी होते. लोंढे यांचा अर्ज दाखल होईपर्यंत राऊत नागपुरात सक्रिय होते. मात्र, खऱ्या अर्थाने जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली तेव्हा राऊत अचानक गायब झाले. नवनिर्वाचित शहराध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्या पदग्रहण सोहळ्यालाही त्यांनी दांडी मारली.
Devendra fadnavis : “एकच सरकार असताना दुजाभाव का?” मुख्यमंत्री फडणवीसांचा केंद्राला सवाल !
उमेदवाराला ‘नवरदेव’ करून निरीक्षक महोदय मात्र चीनमध्ये पर्यटनाचा आनंद लाटत होते, असा बोचरा आरोप आता काँग्रेस कार्यकर्ते जाहीरपणे करू लागले आहेत.
नितीन राऊत यांच्या या भूमिकेवर काँग्रेसचे नगरसेवक विवेक निकोसे यांनी उघड नाराजी व्यक्त करत राऊतांना घरचा अहेर दिला आहे. निकोसे यांनी थेट सवाल केला की, राऊत यांचा चीन दौरा आधीच निश्चित होता, तर त्यांनी निरीक्षकपद का स्वीकारले? स्वतः उपलब्ध नसल्याचे सांगून दुसऱ्या नेत्याची नियुक्ती करण्याची विनंती पक्षाला का केली नाही? या संपूर्ण प्रकरणाची रीतसर तक्रार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे करणार असल्याचेही निकोसे यांनी स्पष्ट केल्याने राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
नागपूर महापालिकेत काँग्रेसचे ३३ नगरसेवक असून, त्यातील बहुतांश नगरसेवक आमदार विकास ठाकरे गटाचे मानले जातात. काँग्रेसकडे विजयासाठी आवश्यक संख्याबळ कमी असताना, विरोधकांची मते खेचणे किंवा आपल्या गोटातील मते फुटू न देणे ही निरीक्षकाची मुख्य जबाबदारी होती. बुटीबोरी नगर परिषदेत काँग्रेस समर्थित २० नगरसेवक असतानाही त्यांची साधी बैठक घेण्याचे सौजन्य राऊत यांनी दाखवले नाही. याउलट, भाजपने या नगरसेवकांशी चर्चा करून आपल्या बाजूने मोर्चेबांधणी केली. नितीन राऊत हे उत्तर नागपूरमधून चार वेळा निवडून आलेले ज्येष्ठ नेते आहेत, तसेच त्यांनी नागपूरचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.
Water crisis : पाणी प्रश्नावर जनतेचा एल्गार; मोर्चामुळे प्रशासन व सत्ताधाऱ्यांची झोप उडाली!
निवडणुकीच्या काळात जोडतोड आणि रणनीतीचे काय महत्त्व असते, हे राऊत यांच्यासारख्या दिग्गजाला ठाऊक नव्हते का? असा संतप्त सवाल नागपूर काँग्रेसमधून विचारला जात आहे. येत्या सोमवारी या निवडणुकीची मतमोजणी होणार असून काँग्रेसची किती मते कायम राहिली आणि किती फुटली, हे निकालातून स्पष्ट होईलच; मात्र त्यापूर्वीच नितीन राऊत यांच्या ‘चीन वारी’ने नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीला पुन्हा एकदा तोंड फोडले आहे.








