Opposition to the ban on improved cotton seeds; farmers stage a protest through direct sowing : केंद्राच्या कृषी धोरणांवर टीका; संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा
Amravati कपाशीच्या सुधारित एचटीबीटी बियाण्यांवरील केंद्र सरकारच्या बंदीविरोधात शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेत कारला येथे आंदोलन केले. शासनाच्या बंदीला आव्हान देत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी प्रतिबंधित बियाण्यांची प्रत्यक्ष लागवड करून निषेध नोंदविला. तसेच शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानापासून वंचित ठेवणाऱ्या धोरणांविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला.
अंजनगाव तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने कारला येथील गजानन पाटील दुधाट यांच्या शेतात हे आंदोलन करण्यात आले. जगातील अनेक देशांमध्ये प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढत असताना भारतातील शेतकऱ्यांना त्यापासून दूर ठेवले जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आंदोलनापूर्वी तहसीलदार, पोलीस प्रशासन आणि कृषी विभागाला निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रतिबंधित बियाण्यांची लागवड करण्यात आली. शासनाच्या धोरणांविरोधातील हा जाहीर निषेध असल्याचे संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित बहाळे, तंत्रज्ञान आघाडीचे प्रमुख मिलिंद दामले, सतीश दाणी, राजेंद्र झोटिंग, दिनकर निस्ताने, सतीश देशमुख, अमरावती जिल्हाध्यक्ष माधव गावंडे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील साबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गजानन पाटील दुधाट यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शेती क्षेत्रातील तांत्रिक प्रगती, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणि कृषी क्षेत्रातील विविध समस्यांवर भाष्य केले. सुधारित बियाण्यांवरील बंदी तातडीने उठविण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.
Operation Tiger : दोन खासदारांनी भूमिका स्पष्ट केली, उर्वरित चार खासदारांबाबत वाढले गूढ !
शेतकरी संघटनेने यापूर्वीही रस्ता रोको, चक्का जाम आणि रेल रोकोसारखी आंदोलने केली असून शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. शेतकरी हितासाठी संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.








