व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative election : १० लाख घेतलेला एक तरी नगरसेवक दाखवा! पराभूत अतुल...

Legislative election : १० लाख घेतलेला एक तरी नगरसेवक दाखवा! पराभूत अतुल लोंढेंना भाजपचे खुले आव्हान

BJP challenges congress leader atul londhe : काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

Nagpur विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल लोंढे यांचा दारुण पराभव झाल्यानंतर, आता नागपूरच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत. भाजपने आमच्या नगरसेवक मतदारांना प्रत्येकी १० लाख रुपये देऊन विकत घेतले, असा खळबळजनक आरोप पराभूत उमेदवार अतुल लोंढे यांनी केला होता, ज्यावरून आता काँग्रेसमध्ये मोठा असंतोष उफाळून आला आहे. लोंढे यांच्या या आरोपाचा जोरदार समाचार घेत, १० लाख रुपये घेतलेला एखादा नगरसेवक तरी समोर आणून दाखवावा,असे खुले आव्हान भाजपने त्यांना दिले आहे.

स्वतःच्या पराभवाचे खापर फोडण्यासाठीच लोंढे असे उलटसुलट आरोप करत असून, यातून ते प्रत्यक्षात काँग्रेसच्याच नगरसेवकांवर अविश्वास दाखवत असल्याचे भाजपने म्हटले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसकडे मतदारांचे पुरेसे पाठबळ नव्हते; या निवडणुकीत भाजपकडे ५८२ तर काँग्रेसकडे २०० नगरसेवकांचे संख्याबळ होते. परंतु, निकालानंतर अतुल लोंढे यांना स्वतःच्या पक्षाची २०० मतेही पदरात पाडून घेता आली नाहीत आणि त्यांना अवघी १३० मते मिळाली. याचा सरळ अर्थ असा की, काँग्रेसच्याच ७० मतदारांनी लोंढे यांना मतदान केले नाही आणि स्वतःची मते राखण्यात अपयशी ठरलेले लोंढे आता पराभव झाल्यावर आरोप करण्यास मोकळे झाले आहेत.

Legislative election: विधान परिषद पराभवानंतर काँग्रेसमध्ये भूकंप: निरीक्षकांची चौकशी होणार, कारणांचा शोध घेण्यासाठी ‘समीक्षा समिती’ स्थापन

प्रचारादरम्यान लोंढे यांनी आपल्या नगरसेवकांची साधी भेट तरी घेतली होती का, तुमचे निरीक्षक कुठे होते आणि बड्या नेत्यांनी काय केले, असा उलट सवाल आता भाजपच्या वतीने केला जात आहे. भाजपचे विजयी उमेदवार राजीव पोतदार यांनी ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशा शब्दात लोंढे आणि आरोप करणाऱ्या काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. नागपूर जिल्हा आणि महापालिकेत काँग्रेसची अवस्था आधीपासूनच बिकट असल्याचे सांगत भाजपने आकडेवारीचा दाखला दिला आहे. महापालिका निवडणुकीतही काँग्रेसचा मोठा पराभव झाला असून, नागपूर जिल्ह्यातील २९ नगर परिषदा आणि नगर पालिकांपैकी केवळ एका ठिकाणी काँग्रेसचा नगराध्यक्ष आहे. तसेच नागपूर महापालिकेच्या १५१ जागांपैकी काँग्रेसचे अवघे ३३ नगरसेवक निवडून आले आहेत, तर भाजपचे १०३ नगरसेवक आहेत. ही आकडेवारी लोंढे यांनी निवडणूक लढण्यापूर्वी तपासली असती, तर त्यांनी निवडणूक लढलीच नसती असा टोलाही भाजपच्या नेत्यांनी लगावला आहे. काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी भाजपचे दुकान बंद करण्याची घोषणा केली होती; मात्र आता नागपूरचेच नव्हे, तर विधान परिषदेच्या निवडणुका झालेल्या सर्वच जिल्ह्यांत काँग्रेसचेच दुकान बंद झाले असल्याचा खोचक टोला आमदार राजीव पोतदार यांनी लगावला आहे.

error: Content is protected !!