व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Vidarbha Farmers : थकीत पीकविम्यासाठी तहसीलसमोर ‘बर्तन बजाव’ आंदोलन

Vidarbha Farmers : थकीत पीकविम्यासाठी तहसीलसमोर ‘बर्तन बजाव’ आंदोलन

Farmers stage protest at tehsil office for pending crop insurance claims : नांदुरात शेतकऱ्यांचा संताप, विमा पॉलिसी ‘रिजेक्ट’चा गोंधळ; शंभर टक्के पीकविम्याची मागणी

Nandura तालुक्यातील पीकविमाधारक शेतकऱ्यांनी थकीत पीकविमा तत्काळ मिळावा, या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर ‘बर्तन बजाव’ आंदोलन सुरू केले आहे. विमाधारक शेतकरी विठ्ठल वानखडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून, शासनाच्या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

यापूर्वी १२ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना लेखी निवेदन देत सन २०२४ चा थकीत पीकविमा तात्काळ जमा करण्याची मागणी केली होती. अन्यथा १६ डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला होता. मात्र या निवेदनाची दखल न घेतल्याने अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

Vanchit Bahujan Aghadi : निवडणूक जाहीर होताच, वंचितने कार्यकारीणी बदलली!

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी हंडा, कोपर, कटोरे व टिनाचे डबे अशा घरगुती वापरातील भांड्यांचा आवाज करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलनाची माहिती देताना विठ्ठल वानखडे यांनी सांगितले की, तालुक्यातील अनेक पीकविमाधारक शेतकऱ्यांच्या चालू वर्षातील पॉलिसी ऑनलाइन प्रणालीत ‘रिजेक्ट’ दाखवण्यात येत आहेत.

ऑनलाइन हेल्पलाइनवर संपर्क साधला असता ‘शेतात पीकपेरा दिसत नाही’ असे कारण सांगितले जात आहे. मात्र पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ व नाराजी निर्माण झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.

Sudhir Mungantiwar : महाराष्ट्रातील अव्वल ‘१०० टक्के सौर ग्राम’ म्हणून उथळपेठची ऐतिहासिक नोंद

या प्रकरणाची शासनाने सखोल चौकशी करून रिजेक्ट झालेल्या सर्व पॉलिसी पुन्हा अॅप्रूव कराव्यात व सरसकट पीकविमाधारक शेतकऱ्यांना शंभर टक्के पीकविमा द्यावा, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. जोपर्यंत पॉलिसी अॅप्रूव होत नाहीत, तोपर्यंत तहसील कार्यालयासमोर बेमुदत ‘बर्तन बजाव’ व मुक्काम आंदोलन सुरूच राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

या आंदोलनात तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले असून, परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे.

error: Content is protected !!