congress-vidhan-parishad-election-2026-thorat-sakpal-candidates-maharashtra-politics : तर महाविकास आघाडीत समीकरणे बदलणार उमेदवारीची चुरस
Mumbai: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत उमेदवारीवरून हालचालींना वेग आला असून काँग्रेस पक्षानेही आपला राजकीय पत्ता उघडल्याची चर्चा रंगली आहे. भारत निवडणूक आयोग यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील ९ जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार असून १२ मे रोजी मतदान आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मर्यादित जागा मिळण्याची शक्यता असल्याने अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.
काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. यामध्ये बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन सकपाळ, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत, हनमंत पवार आणि राजेश राठोड यांचा समावेश आहे. एकाच जागेसाठी अनेक इच्छुक पुढे आल्याने काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून चुरस वाढली आहे.
Nashik crime news : एकाच दिवशी माजी महापौर, गटनेते आणि माजी नगरसेवकावर गुन्हे दाखल
दुसरीकडे महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने राजकीय अनिश्चितता कायम आहे. ठाकरे निवडणूक लढवणार की नाही, यावर महाविकास आघाडीतील जागावाटपाचे अंतिम समीकरण अवलंबून असल्याचे दिसत आहे. त्यांनी निवडणूक लढवली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट त्यांना पाठिंबा देण्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे.
उद्धव ठाकरे निवडणुकीपासून दूर राहिल्यास शिवसेना ठाकरे गटातून पर्यायी उमेदवार देण्याची शक्यता असून अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक आणि सूरज चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील जागावाटप आणि उमेदवारीची लढत अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.
Vidhan parishad election : विधान परिषदेसाठी एकच जागा पण इच्छुकांची मात्र भाऊ गर्दी
विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीला स्पष्ट आघाडी असून त्यांच्या बहुतेक उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. महाविकास आघाडीसमोर मर्यादित संधी असल्याने योग्य उमेदवार निवडण्याचे आव्हान अधिक कठीण झाले आहे. त्यामुळे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यातील समन्वय निर्णायक ठरणार आहे.
Uddhav thackeray : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुनरागमन करणार का?
दरम्यान, विधान परिषदेतील काही विद्यमान आमदारांचा कार्यकाळ संपत असून प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी पोटनिवडणूकही होणार आहे. निवडणूक प्रक्रियेची अधिसूचना २३ एप्रिल रोजी जाहीर होणार असून ३० एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. २ मे रोजी छाननी, ४ मे रोजी माघार आणि १२ मे रोजी मतदान व मतमोजणी होणार असून १३ मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
महाविकास आघाडीत वाढलेली उमेदवारीची स्पर्धा आणि उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाभोवती फिरणारी राजकीय गणिते पाहता या निवडणुकीत पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
__








