व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Wardha District Hospital : तानाजी सावंत यांच्या काळात नागपूरच्या रुग्णालयाशी ‘आर्थिक’ करार?

Wardha District Hospital : तानाजी सावंत यांच्या काळात नागपूरच्या रुग्णालयाशी ‘आर्थिक’ करार?

‘Financial’ agreement with Nagpur hospital during Tanaji Sawant’s tenure : वर्धा जिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा होत्या, तरीही तपासणी नागपुरात

Wardha जिल्हा रुग्णालयांमध्ये सर्व सुविधा निर्माण करून देण्याची जबाबदारी मंत्र्यांची असते. अशा परिस्थितीत उत्तम सुविधा असतानाही सरकारी रुग्णालयातून खासगी रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात येत असेल तर काहीतरी घोळ नक्कीच आहे. तानाजी सावंत आरोग्यमंत्री असताना नागपुरातील एका खासगी रुग्णालयासोबत ‘आर्थिक’ करार झाला. त्या करारानंतर आजपर्यंत रुग्णांना वर्धा येथून नागपूरला तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. त्यामागे कोणता ‘करार’ झाला आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर घोटाळ्याचे आरोप होत आहेत. असे असतानाच त्यांच्या कार्यकाळात येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात झालेला सावळागोंधळ बाहेर येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध आजारांसाठी आवश्यक सर्व तपासणींची सुविधा असताना एसएनसीयू आणि डीईआयसी विभागाने नागपूर येथील एका खासगी रुग्णालयासोबत बालकांची नेत्र तपासणी करण्यासाठी ‘आर्थिक’ सामंजस्य करार केला.

MLA Sulbha Khodke : आरोग्य खात्यातील पदोन्नतींमध्ये पक्षपात?

त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून येथील बालरुग्णांना ७० किमी नागपूर येथील ‘त्या’ खासगी रुग्णालयात पाठवून तपासण्या केल्या जात आहेत. त्या नेमक्या कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात ब्रेन स्टेम ईवोप ऑडिओमेन्ट्री (बेरा), रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्योरिटी लेझर ट्रीटमेंट (आरओपी) तपासणीची उपकरणे, विशेष तज्ज्ञ आदी उपलब्ध आहेत.

बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनीता दीक्षित कार्यरत असेपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालयात बेरा संबंधित तपासण्या केल्या जात होत्या. त्यांच्या कार्यकाळात या कराराची प्रक्रिया झाली. मात्र, त्यांनी या कराराला तीव्र विरोध केला होता. त्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी डॉ. संजय गाठे रुजू झाले. त्यानंतर कराराची प्रक्रिया पूर्ण होऊन बेरा, आरओपी तपासणीसाठी आलेले रुग्ण रुग्णवाहिकेतून ७० किमी अंतरावरील नागपूर येथील ‘त्या’ खासगी रुग्णालयात जाऊ लागले.

तेथे उपचार करून पुन्हा रुग्णालयात दाखल केले जातात. यावर झालेला खर्च शासनाकडून वसूल केला जात आहे. यात मोठा घोळ होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी रुग्णालयातील एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा आयुक्तालयाकडे केली. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही.

Assembly Budget Session : वैद्यकीय अधिकारीच नाहीत, रुग्णांचे किती हाल करणार?

जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरू असलेल्या अनागोंदीला तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी खतपाणी घातल्याची चर्चा आहे. नंतर नियुक्त झालेल्या जिल्हा शल्य चिकित्सकांना यासंदर्भात माहिती आहे. मात्र, यासंदर्भात कोणी बोलायला तयार नाही. रुग्णालयात नियुक्त एका वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंदर्भात आरोग्य सेवा आयुक्त तथा अभियान संचालक यांच्याकडे तक्रार केली. मात्र, अद्याप साधी कारवाईही करण्यात न आल्याने यात मोठा घोटाळा तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.

error: Content is protected !!