व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण झेडपीच्या विकासनिधीच्या नियोजनात हस्तक्षेपाची चर्चा

झेडपीच्या विकासनिधीच्या नियोजनात हस्तक्षेपाची चर्चा

लोकप्रतिनिधींच्या शिफारशींमुळे प्रशासकीयराजकीय  यंत्रणेपुढे पेच!

Washim : जिल्हा परिषदेत प्रशासकराज सुरू असतानाही विकासकामांच्या नियोजनावर राजकीय प्रभाव पडत असल्याच्या चर्चेने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा परिषदेला उपलब्ध होणाऱ्या निधीतून विविध विकासकामे प्रस्तावित केली जात आहेत. मात्र, या कामांच्या मंजुरीसाठी लोकप्रतिनिधींकडून मोठ्या प्रमाणावर शिफारसपत्रे दिली जात असल्याची चर्चा असून, त्यामुळे विकासनिधीच्या वाटपात राजकीय हस्तक्षेप होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण, बांधकाम, पंचायत, लघुसिंचन, आरोग्य आणि शिक्षण विभागांतर्गत विविध विकासकामांचे नियोजन केले जाते. मागील आर्थिक वर्षातही कामांच्या मंजुरीपासून निधीवाटपापर्यंत लोकप्रतिनिधींच्या प्रभावाची चर्चा होती. आता नव्या आर्थिक वर्षाच्या नियोजनातही शिफारशींचा ओघ वाढल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गावांच्या प्रत्यक्ष गरजा, विकासकामांची प्राधान्यक्रमवारी आणि शासनाने निर्धारित केलेले निकष यांना कितपत महत्त्व दिले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ग्रामविकास मंत्र्यांच्या विमानाला बेलोरा विमानतळावर लँडिंगची परवानगी नाकारली

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील कामांच्या नियोजनात एका मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाचा हस्तक्षेप असल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. संबंधित स्वीय सहाय्यक महिन्यातून एक – दोन वेळा वाशिमला येऊन विकासकामांच्या वाटपाबाबत सूचना देत असल्याचा दावा सूत्रांकडून केला जात आहे. या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी प्रशासकीय निर्णयप्रक्रियेतील राजकीय प्रभावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, प्राप्त झालेल्या विकासकामांच्या प्रस्तावांना शासनाने निश्चित केलेल्या नियम आणि निकषांनुसारच मंजुरी दिली जाईल, अशी भूमिका जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केली आहे. निकषांची पूर्तता न करणारे प्रस्ताव मंजूर केले जाणार नसल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सन २०२६-२७ मधील विकासकामांचे नियोजन पारदर्शक पद्धतीने करावे आणि शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी काँग्रेसच्या वाशिम तालुका पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. मात्र, त्यानंतरही विविध विभागांतील कामांच्या नियोजनात शिफारसपत्रांचा प्रभाव असल्याची चर्चा कायम आहे.

हिंमत असेल तर लोकप्रतिनिधींचे ७/१२ जनतेसमोर मांडाच

दुसरीकडे, ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामे मंजूर करताना संबंधित ग्रामपंचायतीला विश्वासात घ्यावे, अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे. ग्रामपंचायतीची संमती न घेता त्यांच्या क्षेत्रातील कामांचे नियोजन करू नये, तसेच शासनाच्या नियमानुसार १५ लाख रुपयांपर्यंतची कामे ग्रामपंचायती स्वतः करू शकत असल्याने अशा कामांची मंजुरी थेट ग्रामपंचायतींना द्यावी, अशी संघटनेची भूमिका आहे.

आता या मर्यादेतील कामे ग्रामपंचायतींकडेच सोपविली जाणार की निविदा प्रक्रियेद्वारे अन्य कंत्राटदारांना दिली जाणार, याबाबतही उत्सुकता आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विकासनिधीचे नियोजन करताना राजकीय शिफारशी, प्रशासकीय निकष आणि ग्रामपंचायतींचे अधिकार यांच्यात नेमका समतोल कसा राखला जातो, हे आगामी निर्णयांवरून स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!