व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण ७६ लाख मतांचा प्रश्न पेटणार; वंचितचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

७६ लाख मतांचा प्रश्न पेटणार; वंचितचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

२८ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात फौजदारी कारवाईची मागणी

Akola महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणत वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदानाचा तपशील सार्वजनिक करण्याच्या मागणीसाठी येत्या २८ ऑक्टोबर रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनातून महाराष्ट्रातील ७६ लाख मतदारांचा प्रश्न उपस्थित करण्यात येणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यासाठी राष्ट्रपतींनी परवानगी द्यावी, अशी मागणीही या मोर्चाद्वारे करण्यात येणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. निवडणूक प्रक्रियेतील कथित त्रुटींकडे लक्ष वेधणे आणि नागरिकांना संभाव्य कायदेशीर अडचणींपासून वाचविणे, हा आंदोलनामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षक मतदारसंघात विक्रमी ९१.०८ टक्के मतदान; २६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद!

मतदार नोंदणीच्या फॉर्ममध्ये बदल केल्याचा आरोप

निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना आंबेडकर यांनी मतदार नोंदणीसाठी वापरण्यात येणाऱ्या फॉर्म क्रमांक ६ चा मुद्दा उपस्थित केला. नवीन मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी असलेला हा फॉर्म मतदार यादीतून चुकीने नाव वगळण्यात आलेल्या नागरिकांनाही भरायला सांगितला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे.

पूर्वी मतदार यादीत नाव असलेल्या व्यक्तीचे नाव वगळले गेल्यास ते पुन्हा समाविष्ट करण्यासाठी स्वतंत्र कायदेशीर तरतूद असताना, अशा नागरिकांना नवीन मतदार नोंदणीचा फॉर्म भरण्यास सांगितले जात असल्याचा दावा आंबेडकर यांनी केला. निवडणूक आयोगाने फॉर्म क्रमांक ६ मध्ये बदल केल्याचाही आरोप त्यांनी केला.

टक्का वाढला, धक्का कुणाला?; नागपूर पदवीधर निकालाची धाकधूक

प्रतिज्ञापत्रामुळे नागरिक अडचणीत येण्याची भीती

फॉर्म क्रमांक ६ सोबत संबंधित नागरिकाला प्रतिज्ञापत्र द्यावे लागत असल्याचा मुद्दाही आंबेडकर यांनी उपस्थित केला. या प्रतिज्ञापत्रात यापूर्वी मतदार नसल्याचे नमूद करावे लागत असल्यास, पूर्वी मतदार असलेल्या व्यक्तीने ते सादर केल्यामुळे खोटे प्रतिज्ञापत्र दिल्याचा आरोप होऊ शकतो. परिणामी, संबंधित नागरिकाला फौजदारी कारवाईला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

नागरिकांना अशा संभाव्य कायदेशीर अडचणीत टाकणाऱ्या प्रक्रियेला विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच! तिन्ही पक्षांचा दावा, सत्तावाटपाचा तिढा !

विविध संघटनांना मोर्चाचे निमंत्रण

२८ ऑक्टोबर रोजी मुंबईत राजमाता जिजाऊ उद्यानापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी डावे आणि समाजवादी पक्ष, विद्यार्थी संघटना तसेच आदिवासी संघटनांना निमंत्रित करण्यात आले आहे. मतदारांच्या प्रश्नावर सर्व संबंधित संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे, डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राज्याचे नेते जितरत्न पटाईत, अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे आणि मिलिंद इंगळे उपस्थित होते.

 

error: Content is protected !!