व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण शिक्षक मतदारसंघात विक्रमी ९१.०८ टक्के मतदान; २६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद!

शिक्षक मतदारसंघात विक्रमी ९१.०८ टक्के मतदान; २६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद!

२७ ऑक्टोबरला मतमोजणी; वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Amravati विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी, २३ ऑक्टोबर रोजी पाचही जिल्ह्यांतील ८१ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत ९१.०८ टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती निवडणूक विभागाने दिली आहे. विशेषतः दुपारी २ ते ४ या वेळेत मतदारांचा मोठा ओघ पाहायला मिळाला. या मतदानातून रिंगणातील २६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, आता सर्वांचे लक्ष २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. पाचही जिल्ह्यांतील मतदान केंद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहितीही विभागाकडून देण्यात आली. मतदानानंतर सर्व मतपेट्या संबंधित स्ट्राँग रूममध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती. अंतिम आकडेवारी जाहीर झाल्यानंतर मतदानाचा जिल्हानिहाय तपशील स्पष्ट होणार आहे.

टक्का वाढला, धक्का कुणाला?; नागपूर पदवीधर निकालाची धाकधूक

अमरावती जिल्ह्यात ८९.३६ टक्के मतदान

अमरावती जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सरासरी ८९.३६ टक्के मतदान झाले. यामध्ये पुरुष मतदारांचा मतदानाचा टक्का ८९.८३, तर महिला मतदारांचा टक्का ८८.६० असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा दिसून आल्या. चांदूर बाजार येथील मतदान केंद्रावरही शिक्षक मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

२७ ऑक्टोबरला १४ टेबलवर मतमोजणी

अमरावती शहरातील विद्यापीठ मार्गावरील लोकशाही भवन येथे मंगळवारी, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून, टपाली मतपत्रिकांच्या मोजणीसाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी १६५ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी महायुतीत रस्सीखेच! तिन्ही पक्षांचा दावा, सत्तावाटपाचा तिढा !

मागील मतदानाचा विक्रम मोडला

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या यापूर्वीच्या निवडणुकीत सुमारे ८५ टक्के मतदान झाले होते. यंदा मतदानाचा टक्का ९१.०८ टक्क्यांवर पोहोचल्याने मागील विक्रम मोडीत निघाला आहे. वाढलेल्या मतदानामुळे उमेदवारांच्या विजयाचे गणित बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतदानातील ही वाढ कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला धक्का देणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

‘पोट्टेहो’चे मास्तर राजकीय वळणावर! नितेश कराळेंपुढे आता कोणते पर्याय?

अमरावती शहरातील मतदान केंद्रांवरील टक्केवारी

अमरावती शहरातील विविध मतदान केंद्रांवर पुढीलप्रमाणे मतदानाची नोंद झाली : केंद्र क्रमांक ८० — ८८.३७ टक्के, केंद्र क्रमांक ३५२ — ८७.१० टक्के, केंद्र क्रमांक ३१२ — ८८.६५ टक्के, केंद्र क्रमांक ३५५ — ८५.९१ टक्के, केंद्र क्रमांक ३८१ — ८८.६० टक्के, केंद्र क्रमांक ३२३ — ८६.३७ टक्के, केंद्र क्रमांक ३४२ — ८९.६३ टक्के, केंद्र क्रमांक ३६४ — ८६.२२ टक्के, केंद्र क्रमांक ३२९ — ८९.०४ टक्के आणि केंद्र क्रमांक ३०२ — ८३.४६ टक्के.

काही ठिकाणी गर्दी, तर काही बुथवर शुकशुकाट

अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल चौक परिसरात प्रमुख उमेदवारांचे बुथ लावण्यात आले होते. यापैकी काही बुथवर मतदारांची गर्दी दिसून आली, तर काही ठिकाणी शुकशुकाट होता. काही बुथवर मतदारांसह राजकीय नेत्यांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली.

 

error: Content is protected !!