Security agencies alerted after threatening call : अमरावतीच्यानांदगाव पेठेत खळबळ; तीनवेळा फोन आल्याने टेंशन
Amravati “मी पाकिस्तान आर्मीमधून बोलत आहे, आम्ही दिल्लीसह चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणार आहोत,” असा व्हॉट्सअॅप व्हॉईस कॉल आल्याने अमरावतीच्या नांदगाव पेठ परिसरात शनिवारी एकच खळबळ उडाली. या कॉलची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांसह सीआयडी, एसआयडी, एटीएस व आयबीच्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
ही धमकी नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरातील ‘डव हेरिटेज गारमेंट’ या कंपनीत टेलर म्हणून काम करणाऱ्या ओडिशामधील प्रशांत ठाकूर (वय ३०) याला सकाळी १० वाजताच्या सुमारास आली. व्हॉट्सअॅप कॉलमध्ये कॉल करणाऱ्याने स्वतःला पाकिस्तानी लष्करातील अधिकारी असल्याचे सांगत दिल्लीतील चार ठिकाणी बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी दिली. कॉल पाकिस्तानच्या +92 कंट्री कोडहून आल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्रशांतने घाबरून हा कॉल तत्काळ कट केला. परंतु त्यानंतर त्याच क्रमांकावरून तीन वेळा पुन्हा कॉल आले. या घटनेची माहिती प्रशांतने डायल 112 वर दिली. माहिती मिळताच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने उपायुक्त सागर पाटील, एसीपी कैलास पुंडकर, ठाणेदार महेंद्र आंभोरे, पीआय आसाराम चोरमले व बाबाराव अवचार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सायबर विभागाच्या मदतीने कॉल करणाऱ्या नंबरचा IP अॅड्रेस ट्रेस करण्याचे काम सुरू केले आहे. हा कॉल व्हर्च्युअल कॉल होता की सिमवरून, हेही तपासले जात आहे.
India – Pakistan : युद्ध थांबले, परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती !
तपास यंत्रणा अलर्ट
घटनेनंतर सीआयडी, एसआयडी, आयबी व अकोला एटीएसचे अधिकारी अमरावतीला दाखल झाले. प्रशांतची चौकशी करून कॉलचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. सद्यस्थितीत ही धमकी फसवी असण्याची शक्यता गृहित धरली असली, तरी खबरदारीचा उपाय म्हणून यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली आहे. संपूर्ण प्रकाराचा तपास गतीने सुरू असून, हा कॉल कुठून, कशासाठी आणि कोणत्या हेतूने आला याचा शोध घेतला जात आहे.