MLA Sudhir Mungantiwar demands for pending works of ‘Jal Jeevan Mission’ to ministers : आमदार सुधीर मुनगंटीवार यांची पाणीपुरवठा मंत्र्यांना मागणी, विधानसभेत मांडला मुद्दा
Mumbai : केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘ हर घर पाणी’ या योजनेत निर्धारित वेळेत प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याची योजना आखण्यात आली. मात्र या योजनेला महाराष्ट्रात खीळ बसली आहे. ही योजना तात्काळ मार्गी लावण्यात यावी. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी विशेष बैठक घेण्यात यावी, तसेच तात्काळ 47 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत लावून धरली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भात तात्काळ बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्याचे मान्य केले.
आमदार मनगंटीवार यांनी महाराष्ट्रातील तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील या योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या योजनेबाबत आकडेवारीसह अभ्यास पूर्ण विवेचन केले. ही योजना प्रत्येक ग्रामीण लोकांसाठी किती आवश्यक आहे, त्यात कशा अडचणी येतात, अधिकाऱ्यांच्या पातळीवर कसा विसंवाद होतो यावर विस्तृत विवेचन केले.
Mahayuti : कार्यकर्त्यांच्या मनात ‘घड्याळ’, सिंदखेडराजात भाजपची पडझड?
ते म्हणाले की, ‘योजना चांगल्या असतात पण त्या योग्य पद्धतीने राबवल्या गेल्या पाहिजेत. कमी कालावधीमध्ये सर्वाधिक जीआर काढण्याचा विक्रम याच पाणीपुरवठा विभागाचा आहे. मे 1960 पासून राज्यामध्ये साधारणता 55 ते 56 हजार जीआर निघाले. त्यातील सर्वाधिक जीआर हे पाणीपुरवठा विभागाचे निघालेले आहेत. हे जीआर काढून उत्तम काम केले आहे कारण ते गरजेचे होते. आपण राज्यात 40 हजार 289 गावांपैकी 40 हजार 191 गावात व्हिलेज अँड सॅनिटेशन कमिट्या केल्या. या मार्फत योजना मंजूर केल्या. ग्रामीण भागामध्ये 51 हजार 558 योजना मंजूर केल्या. या मार्च 2025 पर्यंतच्या पूर्ण व्हायच्या होत्या. पण दुर्दैवाने यापैकी केवळ 25 हजार 549 योजना पूर्ण झाल्या.’
‘पूर्ण झालेल्या योजनांमध्ये सुद्धा 20 टक्के योजना अशा आहेत, ज्या कागदावर पूर्ण झाल्या. याचे मूल्यांकन केलं तर या नळाच्या तोटीतून दादा कोंडकेंच्या गाण्याप्रमाणे थेंब थेंब पाणी येत आहे,’ याकडेही त्यांनी लक्ष वेधलं. आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘1995 मध्ये याच सभागृहात मी ‘टँकर मुक्त’ महाराष्ट्र करण्याची चर्चा झाली होती. मात्र आजही महाराष्ट्र टँकर मुक्त करण्यामध्ये आपल्याला अडचणी आलेल्या आहेत. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे डीपीआर देताना चुका झाल्या मग सुधारित प्रशासकीय मान्यता घ्यावी लागते. या संदर्भातील प्रक्रिया खूप वेळ काढू आणि लांबलचक आहे.’
जिल्हास्तरावरून प्रस्ताव मागवण्यात येतो, मग त्यात त्रुटी काढल्या जातात. याच कामात आपला मोठा पराक्रम आहे. 269 योजना आजही अपूर्ण आहेत. आता त्या शेवटच्या घटका मोजत आहेत. देशात दरवर्षी अतिसारामुळे चार लाख तर अशुद्ध पाण्यामुळे 1.35 बालकांचा मृत्यू होतो. ही केंद्र सरकारची आकडेवारी आहे. हे खूप विदारक चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तेराशे योजनांना मंजुरी दिली. त्यापैकी 487 कार्यान्वित झाल्या. आकडेवारीनुसार 661 योजना पूर्ण झाल्या असे सांगितले, पण त्या अपूर्ण आहेत. माझ्या मतदारसंघांमध्ये 140 योजना मंजूर केल्या. त्याबद्दल आभारी आहे. मात्र यापैकी फक्त 60 योजना कार्यान्वित आहेत. 2025 पर्यंत या योजना पूर्ण करण्याचे टार्गेट होते, असंही मुनगंटीवार म्हणाले.
Local Body Elections : शह-काटशहाच्या राजकारणाने तापलं वातावरण; भाजपची ‘मौन’ खेळी!
गावातल्या कष्टकरी, शेतकऱ्यांना शुद्ध पाणी पाजण्यासाठी सुद्धा अमृत महोत्सवी वर्ष आले तरी आपण शुद्ध पाणी देऊ शकलो नाहीत . चंद्रपूर जिल्ह्यात नाबार्डच्या माध्यमातून देखरेखी साठी 90 लोक ठेवले होते पैसे न दिल्याने 40 पेक्षा कमी लोक उरले आहेत. ते पुन्हा पहिल्यासारखे देण्यात यावे.कार्यकारी अभियंता चे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. ते तात्काळ भरण्यात यावे. मंत्रालयात बल्लारशाह विधानसभा क्षेत्रातील गावाच्या पाणीपुरवठा योजने संदर्भात बैठक घेण्यात यावी. तसेच एक बैठक चंद्रपूरला घेतली जावी. रखडलेले काम सुरू होण्यासाठी दोन महिन्यात 43 कोटी रुपये उपलब्ध करावे, अशी मागणी त्यांनी केली.
या योजना राबवताना सिमेंट रस्ते फोडण्यात आले आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष बाब म्हणून तरतूद करावी. आमच्या जिल्ह्यात एकूण 1300 कोटीच्या योजना आहेत. त्यापैकी 850 कोटीचा निधी मंजूर केला आहे 507 कोटी रुपये अद्याप द्यायचे बाकी आहेत. घराघरात पाणी पोहोचवण्यासाठी अर्थसंकल्पातून मोठी तरतुद करून हे प्रश्न सोडवा अशी मागणी ही आमदार सुधीर मनगटेवार यांनी केली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नावर उत्तर देताना योजनांच्या संदर्भातील प्रगती आणि अडचणी संदर्भात विवेचन केले तसेच बल्लारशा मतदारसंघ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना संदर्भात तात्काळ बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन सभागृहात दिले.