race for congress city and district president post : ‘संघटन सृजन’ अभियानाला वेग; निरीक्षकांकडून अर्ज स्वीकृती, डझनभर नावांची चर्चा
Amravati काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदलांची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून, अमरावती जिल्हा आणि शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी दिसत आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी)चे निरीक्षक अफताब अहमद यांनी ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत इच्छुकांकडून अर्ज स्वीकारले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात नव्या नेतृत्वाला संधी मिळते की विद्यमान चेहऱ्यांवरच पुन्हा विश्वास टाकला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पक्षातील मरगळ दूर करून नवचैतन्य निर्माण करण्याच्या उद्देशाने हे फेरबदल केले जात आहेत. निरीक्षकांनी गेल्या काही दिवसांत स्थानिक नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधत अर्ज मागवले. जिल्हाध्यक्ष पदासाठी डझनभर तर शहराध्यक्ष पदासाठीही अनेक इच्छुकांनी दावेदारी सादर केली आहे.
ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. त्यांच्यासोबतच विद्यमान अध्यक्ष बबलू देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे, सुधाकर भारसाकळे आणि सतीश हाडोळे यांचीही नावे चर्चेत आहेत. बबलू देशमुख यांच्या अनुभव आणि संघटन कौशल्यामुळे त्यांचे पारडे जड मानले जात असले, तरी इतर इच्छुकांनीही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.
Paratwada sexual exploitation case : बदनामीमुळे पीडित तरुणी शांत होती, आता सगळच सांगितलं!
अमरावती शहराध्यक्ष पदासाठीही काँग्रेसमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळत आहे. विद्यमान शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्यासह भय्या पवार, समीर जवंजाळ, मुन्ना राठोड, डॉ. मतीन या युवा नेत्यांची नावे चर्चेत आहेत. याशिवाय माजी महापौर अशोक डोंगरे, माजी शिक्षण सभापती किशोर बोरकर, माजी नगरसेवक सलीम बेग, सुजाता झाडे, विजय बर्वे आणि भय्या निचळ यांच्याही दावेदारीची चर्चा आहे. शहरातील संघटना बळकट करणाऱ्या सक्षम नेतृत्वाची निवड व्हावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
एआयसीसी निरीक्षक अफताब अहमद यांनी सांगितले की, अध्यक्ष पदांसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सर्व अर्ज आणि स्थानिक राजकीय समीकरणांचा अभ्यास करून निरीक्षकांचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतरच अंतिम नियुक्त्यांची घोषणा होणार असून, या बदलांचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.








