Former Melghat MLA joins Congress : अमरावतीत शिवटेकडी येथे १७ सप्टेंबरला होणार शपथविधी
Amravati मेळघाटचे माजी आमदार आणि दबंग नेते म्हणून ओळखले जाणारे राजकुमार पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता अमरावतीतील शिवटेकडी येथील काँग्रेस भवनात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपस्थित राहणार आहेत.
राजकुमार पटेल यांच्या या निर्णयाला त्यांचे सुपुत्र पुत्र व धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित पटेल यांनी खुलेपणाने पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे मेळघाटातील राजकीय समीकरणांमध्ये नव्या घडामोडी घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या कार्यक्रमावेळी पटेल यांच्यासह मेळघाटातील काही महत्त्वाचे पदाधिकारीही काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याचे पक्ष सूत्रांकडून सांगण्यात आले.
Illegal Sand Mining : रेती तस्करांचा हैदोस सुरूच; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
राजकुमार पटेल यांचा राजकीय प्रवासही वैशिष्ट्यपूर्ण राहिला आहे. सुरुवात बहुजन समाज पक्षातून झालेल्या या प्रवासात त्यांनी पुढे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पार्टीमध्ये सक्रिय भूमिका बजावली. २०१४ मध्ये ते प्रहार जनशक्ती पार्टीकडून विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले होते. मात्र मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजप उमेदवाराकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तरीही मेळघाटात त्यांचा राजकीय प्रभाव कायम आहे.
पटेल यांच्या काँग्रेस प्रवेशासाठी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या समन्वयातून अखेर हा पक्षप्रवेश निश्चित झाला. कार्यक्रमाच्या तयारीसाठी रविवारी काँग्रेस भवनात खासदार बळवंतराव वानखडे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात आली. यात पक्षप्रवेश सोहळा भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले.
मेळघाट हा आदिवासी बहुल मतदारसंघ असल्याने येथील राजकीय हालचालींना नेहमीच विशेष महत्त्व असते. काँग्रेसने गेल्या काही काळात या भागातील आपली पकड बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशा परिस्थितीत राजकुमार पटेल यांची काँग्रेसमध्ये एन्ट्री ही पक्षासाठी मोठी ताकद ठरणार आहे. त्यांच्या आगमनामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे.
मेळघाटमध्ये आदिवासी समाजाशी थेट संवाद साधणारे आणि त्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे नेते म्हणून पटेल यांची ओळख आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपसह इतर पक्षांनाही आगामी निवडणुकीत आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागणार, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.








