No funds for martyrs’ memorial plaque : चिखली पंचायत समितीचे दुर्लक्ष चर्चेत, प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका
Chikhali भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर वीर जवानांच्या स्मरणार्थ ‘शिलाफलक’ उभारण्यात आले. हे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (रोहयो) करण्यात आले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही या कामाचा निधी अद्याप ग्रामपंचायतींना मिळालेला नाही. जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील ग्रामपंचायतींना निधी मिळालेला असतानाच चिखली तालुक्याला मात्र निधीपासून वंचित राहावे लागत आहे.
२०२३ मध्ये केंद्र सरकारच्या सूचनेनुसार १५ ऑगस्ट रोजी या शिलाफलकांचे काम करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश तसेच शहीद जवानांना मानवंदना कोरीव स्वरूपात या शिलाफलकांवर रेखाटण्यात आली होती. ग्रामपंचायतींनी मोठ्या उत्साहात या स्मारकांचे अनावरण केले; मात्र काम पूर्ण होऊन दोन वर्षे झाली तरी निधी मिळालेला नाही.
High Court : खड्ड्यांमुळे अपघात; पालिका अधिकाऱ्यांच्या पगारातून दंड वसूल करा
गतकाळातील प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका या कामालाही बसला. जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव उशिरा पाठविणे, त्रुटी दूर न करणे अशा कारणांमुळे निधी रोखला गेला. दरम्यान, आता चिखली पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी मिळाल्याने ग्रामपंचायतींच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतींनी देयके पंचायत समितीकडे सादर केली होती. परंतु ही बिले तब्बल दीड वर्ष प्रलंबित राहिली. अखेर ९ ऑक्टोबर २०२४ रोजी ही बिले विहित नमुन्यात जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आली. मात्र प्रस्तावात त्रुटी असल्याने जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प.) यांनी परिपूर्ण प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे पत्र गटविकास अधिकारी, चिखली यांना पाठविले. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने चिखली तालुक्याचा निधी अद्याप थांबलेला आहे.
“निधीबाबत प्रस्तावातील त्रुटी दूर करून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर केला जाईल. निधी प्राप्त होताच त्याचे तत्काळ वितरण केले जाईल,” असे गटविकास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.








