व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीची महापूजा कोण करणार?

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशीची महापूजा कोण करणार?

Two Deputy Chief Ministers, asking the Law Department : दोन उपमुख्यमंत्री, विधी विभागाला विचारणा

Pandharpur : आषाढी एकादशीच्या उत्सवानंतर आता कार्तिकी एकादशीच्या तयारीला वेग आला असताना, यंदाच्या कार्तिकी महापूजेचा मान कोणाला मिळणार या प्रश्नाने पंढरीत नवचर्चेला तोंड फुटले आहे. राज्यात दोन उपमुख्यमंत्री असल्यानं यंदा पूजेचा सन्मान कोणाला द्यायचा शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे की राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार या द्विधा स्थितीत विठ्ठल मंदिर समिती अडकली आहे.

पंढरीतील विठ्ठल मंदिर समितीची बैठक सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत कार्तिकी एकादशीच्या तयारीसोबतच पूजेच्या मानाच्या विषयावरही सविस्तर चर्चा झाली. परंपरेनुसार, आषाढी एकादशीची महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. मात्र, राज्यात सध्या दोन उपमुख्यमंत्री असल्याने हा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. त्यामुळे आता मंदिर समिती हा निर्णय विधी व न्याय विभागाकडे सोपवणार आहे.

Amit Shah : अमित शाह यांची शिर्डीत फडणवीस, शिंदे अजितदादा सोबत मध्यरात्री गुप्त बैठक !

यंदाची कार्तिकी एकादशी 2 नोव्हेंबर रोजी साजरी होणार असून, यंदा पूजेचा मान कोणाला मिळणार याकडे राज्याचे तसेच भाविकांचे लक्ष लागले आहे. बैठकीत कार्तिकी यात्रेच्या विविध तयारींचा आढावा घेण्यात आला. 26 ऑक्टोबरपासून भाविकांसाठी 24 तास दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आषाढीप्रमाणेच कार्तिकी कालावधीतही अखंड दर्शन व्यवस्था सुरू राहील.

तसेच, मंदिर जतन व संवर्धनाबाबत विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र बैठक घेण्याचे ठरले. प्रस्तावित पंढरपूर विकास आराखड्यात मुखदर्शनरांग, प्रशासकीय कार्यालय, अन्नछत्र आणि अन्य सुविधा उभारण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव देण्याचे ठरले. याशिवाय, कम्युनिटी रेडिओ केंद्र स्थापन करण्यासाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्याचे, तसेच एमटीडीसी भक्तनिवासाचा करारनामा वाढवण्याचे निर्णयही घेण्यात आले.

बैठकीस सदस्य शकुंतलाताई नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, संभाजी शिंदे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगांवकर, ॲड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत तसेच पुरातत्त्व विभागाचे डॉ. विलास वाहणे, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे आणि ठेकेदार उपस्थित होते.

CMs warning : काटामारी करणारे कारखाने मी शोधलेत, त्यांना दाखवतो !

दोन उपमुख्यमंत्री आणि एकच पूजेचा मान या राजकीय आणि धार्मिक समतोलाचा तोल साधत, आता विधी विभाग काय निर्णय देतो याची उत्सुकता राज्यभरातील भाविक आणि राजकीय वर्तुळात शिगेला पोहोचली आहे.

error: Content is protected !!