ABVP attacks Nagpur University administration : नागपूर विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात ABVP चा हल्लाबोल
Nagpur : नागपूर विद्यापीठातील वाढती प्रशासकीय अकार्यक्षमता, निकालातील अनियमितता आणि पदभरतीतील विलंबाविरोधात विद्यार्थ्यांमध्ये संताप उफाळून आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP या प्रश्नांवर आता रस्त्यावर उतरणार आहे. उद्या १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरून धडक ऊर्जा काढण्यात येणार आहे.
ABVP ने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. वारंवार तक्रारी देऊनही विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. परीक्षा विकास निकालातील विलंब, पुनमूल्यांकनातील अनियमितता, पदभरतीतील भ्रष्टाचार, अभ्यासक्रमातील कालबाह्यता तसेच छात्र संघ निवडणुका न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. या सर्व प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला जागे करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी एकत्र येणे आवश्यक झाले आहे, असे ABVP च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Municipal Corporation Election : अनेकांना बसला सोडतीचा फटका, दिग्गज नेते हादरले !
उद्याच्या मोर्चादरम्यान ‘ऊठ दोस्ता उगार मूठ – तुझ्या शिक्षणाची तूच थांबव लूट’, अशी घोषणाबाजी करण्यात येणार आहे. हजारो विद्यार्थी विद्यापीठाच्या प्रशासनाविरोधात आवाज उठवतील. ABVP ने सर्व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना मोर्चात सहभागी होण्याची आवाहन केले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा निकाल प्रक्रियेत पारदर्शकता आणावी, रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, नव्या अभ्यासक्रमांची अंमलबजावणी आणि जुन्या विषयांची पुनरावलोकन करावे, विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधित्वासाठी छात्रसंघ निवडणुका घ्याव्या, प्रवेश प्रक्रिया सुलभता आणि एकसमान मार्गदर्शक तत्वे लागू करावी या प्रमुख मागण्या मोर्चादरम्यान करण्यात येणार आहेत.
Local Body Elections : निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमधील गटबाजी ठरणार घातक !
हा मोर्चा विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत नेण्यात येणार आहे. त्यानंतर कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे नागपूर विद्यापीठ परिसरात काहीशी उत्सुकता तर काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी सुरू झालेल्या या धडक मोर्चाने विद्यापीठ प्रशासनाच्या कारभाराला नवा झटका लागणार, हे निश्चित.








