Chief Minister Devendra Fadnavis made an important demand to Union Power Minister Manohar Lal Khattar in a meeting at New Delhi : नवी दिल्लीतील बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे महत्त्वपूर्ण मागणी
New Delhi : महाराष्ट्राच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी महत्त्वाची घडामोड म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री मनोहरलाल खट्टर यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. संशोधित वीज वितरण क्षेत्र योजनेअंतर्गत (RDS S) दोन हजार ६५५ कोटींच्या निधीची मागणी केली. या निधीसंबंधी लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन रक्कम वितरित करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले असल्याची माहिती आहे.
या बैठकीत राज्याच्या महत्त्वाकांक्षी ऊर्जा प्रकल्पांवरही विस्तृत चर्चा झाली. विशेषत: आठ हजार मेगावॅट तास क्षमतेच्या बॅटरी स्टोरेज प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून व्यवहार्यता तूट निधी (Viability Gap Funding) देण्याबाबत खट्टर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यापूर्वी चार हजार ५०० MWh क्षमतेच्या प्रकल्पासाठी केंद्राने असा निधी मंजूर केला असून त्याच्या निविदा प्रक्रियाही सुरू आहे. राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण आता आठ हजार MWh चा आणखी मोठा प्रकल्प राबवणार आहे, ज्यामुळे नवीकरणीय ऊर्जेच्या साठवण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.
नवीकरणीय ऊर्जेचे उत्पादन वाढत असताना, अतिरिक्त वीज साठवून ती कमाल मागणीच्या काळात वापरण्यासाठी बॅटरी स्टोरेज हे तंत्रज्ञान अत्यावश्यक ठरत आहे. यामुळे राज्याच्या ऊर्जा व्यवस्थापनात स्थिरता येणार असून, पायाभूत सुविधांची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
बैठकीत सौर ऊर्जा पारेषणासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांवर, राज्यात प्रस्तावित असलेल्या १८ मोठ्या सौर प्रकल्पांवर, तसेच ग्रीडमध्ये उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्यांच्या उपायांवरही सविस्तर चर्चा झाली.
MP-MLA Pending Case : खासदार- आमदारां विरोधातील प्रलंबित खटल्यांचा ढिगारा!
महाराष्ट्रात ऊर्जा क्षेत्रात राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केंद्राला दिली. यात संसाधन पर्याप्तता आराखडा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम (BESS), पंप स्टोरेज प्रकल्प या महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश होता. बैठकीस केंद्रीय ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र, एनटीपीसीचे CMD गुरुदीपसिंग आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या चर्चेमुळे महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.








