BJP defeated Congress candidate in Mouda, Congress is also preparing to take revenge : मौद्यात भाजपने काँग्रेसचा उमेदवार पळवला, काँग्रेसही बदला घेण्याच्या तयारीत
Nagpur : नागपूर जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम चांगलीच वाढली असून राजकीय वातावरण तापले आहे. प्रमुख सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळावर लढण्याचा नारा देत कार्यकर्त्यांना सज्ज केले आहे. जिल्हाभरातील प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांची लगबग वाढली असून, सत्याबरोबर कोण राहणार, याचीही चढाओढ सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये उमेदवारांची पळवापळवी, स्थलांतर आणि रणनीती बदल या हालचालींना वेग आला असला, तरी अंतिम सामना मात्र भाजप विरुद्ध काँग्रेस अशाच परंपरागत दोन ध्रुवांमध्ये रंगणार, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. इतर पक्षांचे अस्तित्व असले तरी प्रत्यक्ष लढत ही दोन्ही प्रमुख पक्षांसाठी प्रतिष्ठेची राहणार आहे. दरम्यान, अलीकडेच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रसन्ना (राजाभाऊ) तिडके हे भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून गंभीर चर्चेत आहेत. त्यांचे स्थानिक पातळीवरील नेटवर्क, ओळख आणि संघटनातील बळ पाहता भाजप त्यांच्यावर मोठी बाजी लावू शकतो, असे पक्षातील सूत्रांचे संकेत आहेत.
Sanjay Raut Health Update: दुर्धर आजारावर मात करत संजय राऊत घराबाहेर
तथापि, तिडकेंच्या प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये मोठी संतापाची लाट उसळली आहे. तिडक्यांनी केलेली बेईमानी आणि अचानक पक्षत्याग, याचा बदला घेण्यासाठी काँग्रेस पूर्णपणे सज्ज असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. काँग्रेसच्या संघटनात्मक बैठका, शहर-तालुका स्तरावरील संपर्क मोहिमा आणि संभाव्य उमेदवारांची तयारी, यांवरून काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत तिडक्यांना सामना सोपा होऊ देणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
Fake PMO Officer : फडणवीसांच्या कार्यक्रमात PMO सचिव असल्याचा खोटा आव!
उमेदवारांची चढाओढ आणि निवडणूकपूर्व राजकीय फिरस्त्या पाहता जिल्ह्यातील निवडणूक वातावरणात चुरस निर्माण झाली आहे. कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार आपल्या-आपल्या पक्षांच्या तंबूत पाठबळ मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. विविध प्रभागांमध्ये अंतर्गत गटबाजी, बदलती निष्ठा आणि तिकीट वाटपाची समीकरणे, या सर्वांमुळे स्थानिक राजकारणात चांगलाच रंगतदार संघर्ष दिसू लागला आहे. एकूणच, नागपूर जिल्ह्यातील निवडणुका यावेळी स्वबळाचा नारा, उमेदवारांची पळवापळवी, आणि भाजप–काँग्रेस यांच्यातील सरळ टक्कर या तीन मुद्द्यांभोवती फिरणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.








