Ram Mandir flag hoisting : अयोध्येत पुन्हा भगवा फडकला; आजचा दिवस अत्यंत अर्थपूर्ण !

Flag of Ram Rajya has risen again Mohan Bhagwat statement is in news : रामराज्याचा ध्वज परत उभा राहिला” मोहन भागवतांचे विधान चर्चेत

Ayodhya : अयोध्येत आज इतिहास साक्षी ठेवणारा क्षण घडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरावर भगवा ध्वज फडकताच संपूर्ण परिसरात उत्साह, भक्तिभाव आणि कडक सुरक्षेच्या वातावरणात दिव्य सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी मर्यादित संख्येने निमंत्रित मान्यवर उपस्थित होते. ध्वजारोहणाच्या दिवशी मंदिरातील सामान्य दर्शन काही काळासाठी थांबवण्यात आले होते. पंतप्रधान मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतही या सोहळ्यात सहभागी झाले आणि त्यांनी केलेले वक्तव्य आता सर्वत्र चर्चेचा विषय बनले आहे.

कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत म्हणाले की, आजचा दिवस सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. “ज्यांनी राम मंदिरासाठी आपला जीव अर्पण केला, त्यांचे आत्मे आज समाधानी झाले असतील. अशोकजींसारख्या अनेकांना नक्कीच शांती मिळाली असेल,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, अयोध्येत एकेकाळी फडकणारा रामराज्याचा ध्वज आज पुन्हा अभिमानाने मंदिरावर फडकला आहे. भगव्या ध्वजावरील रघुकुल वंशाचे प्रतीक असलेला वृक्ष हा त्याच्या सामर्थ्याचा, त्यागाचा आणि संरक्षणाच्या भावनेचा संदेश देतो. “झाड सावली देतं, फळ देतं, स्वतः उन्हात उभं राहून सर्वांना आधार देतं हाच रघुकुलाचा आणि भारताच्या धर्मपरंपरेचा आत्मा आहे,” असे भागवत म्हणाले.

Maharashtra politics : ‘पैशांची मस्ती वाढलीय’, महायुतीत फोडाफोडीचे संकेत!

ते पुढे म्हणाले की, सूर्यदेव हा संकटांवर मात करण्याच्या शक्तीचे प्रतीक आहे आणि आजचा ध्वजारोहण सोहळा म्हणजे केवळ मंदिराच्या पूर्णतेचा नाही तर भारतीय संस्कृतीच्या तेजस्वी पुनर्स्थापनेचा क्षण आहे. “भगवा हा धर्म, सत्य आणि उन्नत विचारांचा ध्वज आहे. जगाला सत्य देणारा भारत पुन्हा उभा करायचा आहे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. नरेंद्र मोदींनी दिलेल्या ‘जे म्हटले ते केले पाहिजे’ या संदेशालाही त्यांनी विशेष अधोरेखित केले.

Local body election : महाराष्ट्रात घराणेशाहीचा कळस! शिंदे गट व भाजपचे नवे ‘फॅमिली पॅक’

या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही भाषण केले. त्यांच्या भाषणातून उत्साह, श्रद्धा आणि नवभारताची ऊर्जा प्रकट झाली. “मंदिरावर फडकणारा भगवा ध्वज हा नवीन भारताचे प्रतीक आहे. पाचशे वर्षांत अनेक बदल झाले सत्ता, नेतृत्व, व्यवस्था पण रामावरची श्रद्धा कायम राहिली,” असे ते म्हणाले. अयोध्येमध्ये या सोहळ्यानिमित्त कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून कार्यक्रम स्थळी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात आहेत.

राम मंदिरावर भगवा पुन्हा फडकण्याचा हा दिवस भारतासाठी ऐतिहासिक आणि भावनिक अशा दोन्ही स्तरांवर महत्त्वाचा ठरला असून या पार्श्वभूमीवर मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्या भाषणांनी अयोध्येतील वातावरणात आध्यात्मिक आणि राष्ट्रभावनेची नवी ऊर्जा निर्माण केली आहे.

____