BJP-Congress face to face; Vijay Wadettiwar takes Mundhe side : भाजप-काँग्रेस आमनेसामने; विजय वडेट्टीवारांनी मुंढे यांची बाजू घेतली
Nagpur : विधानसभेच्या नागपूर अधिवेशनात आज सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध आणलेल्या लक्षवेधीवरून मोठा गदारोळ झाला. भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी सभागृहात बोलताना तुकाराम मुंढेंच्या समर्थकांकडून “बघून घेऊ” अशी धमकी मिळाल्याचा गंभीर आरोप केला. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाचा अतिरिक्त पदभार चुकीच्या पद्धतीने तुकाराम मुंढेंनी स्वतःजवळ ठेवून घेतल्याची माहिती त्यांनी विधानसभेत मांडली. या संदर्भात आपण लक्षवेधी दिली असून त्यामध्ये सर्व तपशील नमूद केले असल्याचेही खोपडे यांनी सांगितले.
खोपडे यांनी पुढे विधानसभेत म्हटले की, नागपूर अधिवेशनासाठी आल्यानंतर दोन व्यक्तींनी फोन करून धमकी दिली. तक्रार नोंदविल्यानंतरही या प्रकरणात कारवाई न झाल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी भाजपाचे आणखी एक आमदार प्रवीण दटके यांनीही तुकाराम मुंढेंविरुद्ध सभागृहात आवाज उठवला. त्यांनी 20 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्र शासनातील धनंजय भागवत कक्ष अधिकारी यांनी नागपूर स्मार्ट सिटी नियुक्तीवरील कारवाईबाबत केलेले पत्र सभागृहात दाखवले. तसेच एका प्रसूतीनंतर सुट्टीवर असलेल्या महिलेचे रजेचे आदेश रद्द केल्याचा मुद्दा आणि दुसऱ्या एका महिलेशी अयोग्य शब्दप्रयोग केल्याच्या तक्रारीचीही त्यांनी नोंद घेतली.
यावेळी आंदोलन केवळ सत्ताधारी बाजूनेच नाही तर विरोधकांनीही जोरदार सहभाग नोंदवला. मात्र काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तुकाराम मुंढे यांची उघडपणे बाजू घेत सत्ताधारी सदस्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. त्यांनी सभागृहात सांगितले की, “तुकाराम मुंढे प्रामाणिक आहेत की नाही यावर शंका निर्माण करण्याची गरज नाही. नागपूर महापालिकेत कार्यरत असताना आयोगाने त्यांना क्लीन चीट दिली आहे. महिला आयोगाकडे झालेल्या तक्रारीतही तक्रार करणाऱ्या महिलेलाच दंड झाला आहे. केंद्रीय महिला आयोगानेही क्लीन चीट दिली आहे. त्यामुळे काहींच्या स्वार्थापायी त्यांच्यावर आरोप केले जात आहेत.”
Winter session : लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, नाहीतर घरी बसावं लागेल
त्यांनी पुढे मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. “काही चूक असेल तर कारवाई व्हावी; नसल्यास निष्पाप अधिकाऱ्यावर दबावाखाली कारवाई होऊ नये,” असे वडेट्टीवार यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी मिळणे अस्वीकार्य असल्याचे म्हणत कृष्णा खोपडे यांना धमकी देणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
सभागृहातील या जोरदार वादानंतर वातावरण तणावपूर्ण झाले. तुकाराम मुंढे प्रकरणावर आता सरकार कोणती भूमिका घेते आणि पुढील कारवाई कशी होते याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
———-








