approval has been given to increase the cotton procurement limit : मुख्यमंत्री फडणवीस यांचा आदेश; प्रस्ताव केंद्राकडे, प्रति एकर ९.५० क्विंटल मर्यादा
Akola राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सीसीआयकडून कापूस खरेदीची मर्यादा वाढविण्यास तत्त्वतः सहमती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानभवनात संबंधित सर्व उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कापूस खरेदीची मर्यादा प्रति एकर ९.५० क्विंटल (प्रतिहेक्टर २३.६८ क्विंटल) करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
राज्यातील कापूस खरेदी मर्यादा वाढविण्यासाठी भाजपा विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतरच ही तातडीची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
Sudhir Mungantiwar : माझा शेतकरी महत्त्वाचा म्हणत मुनगंटीवार विधानसभेत गरजले..
११ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनातील म.वि.स. २९३ अन्वयेच्या चर्चेदरम्यान आमदार सावरकर यांनी सीसीआयकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कापसाच्या उत्पादन मर्यादेत वाढ करण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन प्रस्ताव अंतिम केला.
शेतकरी मंडळी किमान आधारभूत किमतीनुसार (एमएसपी) कापूस विक्रीस आणत असताना मर्यादा कमी असल्याने त्यांना पूर्ण उत्पादन विकणे शक्य होत नव्हते. प्रगतशील शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनीही प्रत्यक्ष उत्पादन अधिक असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
राज्यातील सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या तीन कापूस उत्पादक जिल्ह्यांची सरासरी उत्पादकता विचारात घेऊन खरीप २०२५ साठी २३.६८ क्विंटल प्रतिहेक्टर ही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसारचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला जात आहे. त्यामुळे सीसीआयकडून कापूस खरेदी वाढविण्याचे मार्ग खुले झाले आहेत.
Winter session : पुरवणी मागण्यांवर सभागृहात अजित पवारांचा सविस्तर खुलासा
दरम्यान, ३ डिसेंबर रोजी जारी केलेल्या परिपत्रकात अत्यल्प प्रमाणात खरेदी मर्यादा वाढीचा विचार करण्यात आला होता. मात्र आजच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षांनुसार मोठा दिलासा देणारी सुधारित मर्यादा लागू करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.








