व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण .Fadnavis on Shinde: सातारा ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची ठाम पाठराखण

.Fadnavis on Shinde: सातारा ड्रग्ज प्रकरणात देवेंद्र फडणवीसांकडून एकनाथ शिंदेंची ठाम पाठराखण

said,I congratulate police, they deliberately smearing name : म्हणाले, ‘मी पोलिसांचं अभिनंदन करतो, जाणीवपूर्वक नाव गोवलं जात आहे’

Mumbai: साताऱ्यातील महाबळेश्वर परिसरातील सावरी गावात सापडलेल्या तब्बल 145 कोटी रुपयांच्या ड्रग्ज साठ्याच्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पहिल्यांदाच जाहीर भूमिका मांडली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाम पाठराखण करत विरोधकांवर जोरदार टीका केली.

या ड्रग्ज प्रकरणात सापडलेली जागा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे यांच्या मालकीची असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, साताऱ्यात पोलिसांनी धाड टाकून इतका मोठा ड्रग्ज साठा जप्त केला, त्यासाठी सर्वप्रथम मी महाराष्ट्र पोलीस दलाचे अभिनंदन करतो. चालू असलेला बेकायदेशीर धंदा पोलिसांनी उघडकीस आणला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे.

Buldhana Collector : जिल्ह्यात ८४ हजार ७५ एकल महिला; शहरी-ग्रामीण सर्वेक्षणातून वास्तव समोर

देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या प्रकरणात जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा प्रकार चुकीचा, अयोग्य आणि निषेधार्ह आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कोणत्याही पुराव्यात एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या कुटुंबाचा थेट संबंध आढळून आलेला नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून सत्य बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबतही भाष्य केले. त्यांनी सांगितले की, माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा मंजूर करण्यात आला असून, त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. मात्र, कोकाटे यांच्या आमदारकीचा राजीनामा, अटक वॉरंट किंवा पुढील कायदेशीर प्रक्रियेबाबत त्यांनी कोणतीही टिप्पणी करण्याचे टाळले.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमिकेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्र्यांची तळमळ मी समजू शकते, मात्र त्यांनी असा खोटा कळवळा दाखवू नये. एकनाथ शिंदे यांना संपवण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत, हे सांगायला त्यांनी मला भाग पाडू नये. संविधानाने न्यायव्यवस्था दिली आहे आणि कोण बरोबर, कोण चूक हे ठरवण्याचा अधिकार न्यायालयांना आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः न्यायाधीश होण्याचा प्रयत्न करू नये, अशी टीकाही त्यांनी केली.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी ठरवलं… आणि ‘होणार नाही’ हे अशक्य !

सुषमा अंधारे यांनी पुढे स्पष्ट केले की, एकनाथ शिंदे यांचा थेट संबंध आहे, असे आपण म्हणत नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रकाश शिंदे यांच्याबाबत प्रश्न उपस्थित होत असून, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असल्याचा फायदा प्रकाश शिंदे यांना होऊ शकतो आणि तपासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही काळ एकनाथ शिंदे यांनी पदापासून दूर राहावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

एकूणच सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र झाली असून, या प्रकरणातील तपास आणि पुढील कारवाईकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!