Municipal elections : ‘हा वचननामा नाही तर वाचूननामा; भ्रष्टाचार आणि गोंधळाची युती’

Chief Minister Fadnavis attacks Thackeray brothers promise : मुख्यमंत्री फडणवीसांकडून ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावर हल्लाबोल

Mumbai: मुंबई महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचाराने जोर पकडला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीने आज आपला वचननामा जाहीर केला. मात्र या वचननाम्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार शब्दांत टीका केली. ते कांदिवली येथे आयोजित सभेत बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख ‘मामू’ असा करत उपरोधिक शैलीत टोले लगावले. आमचे मामू उद्धोजी आणि नव्याने पुन्हा प्रेम उफाळलेले राजजी यांनी एक वचननामा जाहीर केला आहे, असे म्हणत त्यांनी या युतीची खिल्ली उडवली. वचननामा देण्याचा अधिकार फक्त बाळासाहेब ठाकरे यांनाच होता, असा थेट हल्लाबोल फडणवीस यांनी केला.

Devendra Fadnavis : अमरावतीत आयटी, टेक्स्टाईल पार्क; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

आज जाहीर झालेला हा वचननामा नसून तो ‘वाचूननामा’ असल्याची टीका त्यांनी केली. तो वाचून दाखवण्यात आला, पण नेमकं काय वाचलं हे त्यांनाही माहिती नसावं, असा टोला लगावत फडणवीस म्हणाले की, एका वृत्तवाहिनीने २०१७ सालच्या त्यांच्या आश्वासनांचा फॅक्ट चेक केला होता आणि त्यात त्यांनी दिलेल्या पाच वचनांपैकी एकही वचन पूर्ण झालं नसल्याचं स्पष्ट झालं होतं. खोटं बोलायचंच असेल तर तो वचननामा आईच्या चरणी कशासाठी ठेवायचा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावेळी फडणवीस यांनी शेरोशायरीच्या माध्यमातूनही टीका केली. वचननामा तयार करताना ते एकमेकांत काय बोलत असतील, याची चौकशी केली असता ‘झुटोंने झुटोंसे का सच बोलो, दो भाईयों का ऐलान हुआ सच बोलो, घर के अंदर झुटों की मंडी है, दरवाजे पर लिखा है सच बोलो’ अशा शब्दांत त्यांनी टोलेबाजी केली.

सभेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावरही निशाणा साधला. दोन युवराज तिथे कुठलातरी शो करत होते, मोठ्या स्क्रिन्स, राहुल गांधींसारख्या येरझऱ्या, आणि भाषणं सुरू होती, अशी टीका त्यांनी केली. मुंबईत चांगली शौचालये नाहीत, असं त्यांनी म्हटलं असल्याचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले की, हे प्रश्न आम्हाला का विचारता, घरी जाऊन काका किंवा बाबांना विचारा. २५ वर्षांत मुंबईत शौचालये का उभी राहिली नाहीत, याचं उत्तर त्यांनी द्यायचं की आम्ही, असा सवाल त्यांनी केला.

Amravati Municipal Corporation : राणा-खोडके यांच्यात ‘ओपन वॉर’, आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले

आज जाहीर झालेल्या वचननाम्यात वचनही नाही आणि नामाही नाही, अशी घणाघाती टीका करत फडणवीस म्हणाले की, ही युती कार्टूनिस्ट आणि कॅमेरामनची किंवा कॅमेडियन आणि कॅमेरामनची नाही, तर भ्रष्टाचार आणि गोंधळाची युती आहे. या शब्दांत त्यांनी ठाकरे गट आणि मनसेच्या युतीवर जोरदार हल्लाबोल केला.