व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Neet Paper leak : नीट पेपरफुटी प्रकरण तापलं; उद्धव ठाकरे जंतरमंतरवर

Neet Paper leak : नीट पेपरफुटी प्रकरण तापलं; उद्धव ठाकरे जंतरमंतरवर

neet-paper-leak-protests-uddhav-thackeray-at-jantar-mantar-raj-thackeray-azad-maidan-congress-protest : राज ठाकरे आझाद मैदानात, काँग्रेसचाही एल्गार

Mumbai : नीट पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या पार्श्वभूमीवर देशभरातील आंदोलन अधिक तीव्र होताना दिसत आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या आंदोलनाला आता राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले असून विविध राजकीय पक्षांनीही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील जंतरमंतरपासून ते मुंबईतील आझाद मैदानापर्यंत आंदोलनाची व्याप्ती वाढत असून ठाकरे बंधूंसह काँग्रेसनेही सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

दिल्लीतील जंतरमंतर आणि संसद परिसरात आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जनंतर विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त होत असून आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांसह विविध संघटनांची गर्दी वाढत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

Rahul Gandhi : विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठीच मोदी निवासाबाहेर ठिय्या आंदोलन

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दिल्लीत यांनी दिल्लीत जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने गंभीरपणे विचार करावा आणि परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर कराव्यात, अशी भूमिका त्यांनी मांडल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केली आहे. पक्षाने “चला व्यवस्थेला प्रश्न विचारूया” या घोषवाक्यासह मनसैनिकांना सकाळी ११ वाजता आझाद मैदानात उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या आंदोलनात मनसेप्रमुख राज ठाकरे सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे समर्थन करत त्यांचे धैर्य कौतुकास्पद असल्याचे म्हटले. श्रीलंकेतील २०२२ मधील विद्यार्थी आंदोलन, अरब स्प्रिंग आणि जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांच्या एकजुटीमुळे मोठे सामाजिक बदल घडू शकतात, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

Buldhana Zilla Parishad : ‘शिक्षक द्या, नाहीतर उठणार नाही’; भिंगारा ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेसमोर ठिय्या, अखेर पाच शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती

दरम्यान, काँग्रेसनेही विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनाची हाक दिली आहे. युवक काँग्रेसच्या वतीने मुंबईतील अंधेरी येथे दुपारी १.३० वाजता निदर्शनांचे आयोजन करण्यात आले असून शिक्षण व्यवस्था, परीक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर सरकारला जाब विचारला जाणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

नीट पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटी आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या मुद्द्यावर सुरू झालेले आंदोलन आता व्यापक राजकीय स्वरूप धारण करत आहे. दिल्ली आणि मुंबईसह विविध शहरांमध्ये होणाऱ्या आंदोलनांमुळे केंद्र सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या घडामोडींवर देशाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!