BJP leaders son Jiten Barethia approved corporator with support from AIMIM : एमआयएमच्या पाठिंब्यावर भाजप नेत्याचे पुत्र जितेन बरेठिया स्वीकृत नगरसेवक
Akola : अकोल्यातील अकोट नगरपालिकेत भाजप आणि एमआयएम यांच्यातील वादग्रस्त युतीचा दुसरा अंक समोर आला असून, पुन्हा राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. नगरपालिकेत स्वीकृत सदस्य निवडण्याच्या प्रक्रियेत भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचे पुत्र जितेन बरेठिया यांना एमआयएमच्या पाचही नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने ते स्वीकृत नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे भाजप आणि एमआयएम यांच्यात थेट युती नसल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात ही अप्रत्यक्ष युतीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
गेल्याच आठवड्यात अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेससोबत आणि अकोल्यातील अकोटमध्ये एमआयएमसोबत युती केल्याचे समोर आल्यानंतर राज्यभरात मोठा गदारोळ झाला होता. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित ठिकाणी युती तोडण्याचे आदेश दिले होते. तसेच अकोटमधील या युतीस जबाबदार धरत स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांना भाजपकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. भाजपने अधिकृतपणे एमआयएमसोबत कोणतीही युती मान्य नसल्याचेही स्पष्ट केले होते.
Rajmata Jijau : ४११ कोटींचा विकास आराखडा फक्त कागदावरच; ‘मातृतीर्थ’ सिंदखेड राजाकडे शासनाचे दुर्लक्ष
या घडामोडीनंतर एमआयएमने भाजपच्या नेतृत्वाखालील ‘अकोट विकास मंचा’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता आणि एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी स्वतंत्र गट स्थापन केला होता. मात्र, पहिल्या युतीवरून वाद निर्माण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच स्वीकृत सदस्य निवडीतून पुन्हा एकदा भाजप–एमआयएम जवळ आल्याचे चित्र समोर आले आहे.
नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी एमआयएमकडून ताज राणा यांचे नाव पुढे करण्यात आले होते. त्याचवेळी एमआयएमने भाजपचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र बरेठिया यांचे पुत्र जितेन बरेठिया यांनाही उमेदवारी दिली होती. मात्र, ताज राणा यांनी मुदत संपल्यानंतर अर्ज दाखल केल्याचे कारण देत त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला नाही. परिणामी, एमआयएमकडून आलेला एकमेव वैध अर्ज जितेन बरेठिया यांचा राहिल्याने ते एमआयएमच्या पाठिंब्यावर स्वीकृत नगरसेवक ठरले.
या प्रक्रियेत एमआयएमच्या पाचही नगरसेवकांनी जितेन बरेठिया यांना समर्थन दिले. यात गटनेत्या आफरीन अंजुम शरीफोद्दीन यांच्यासह दिलशादबी रज्जाक खा, रेशमा परविन मोहम्मद अजीम, डॉ. युसूफ खान हादीक खान आणि हन्नान शाह सुलतान शाह यांचा समावेश आहे. भाजप नेत्याच्या मुलाला नगरसेवक बनवण्यासाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी दिलेला हा पाठिंबा अप्रत्यक्ष युतीचेच उदाहरण असल्याचे बोलले जात आहे.
Raver Municipal Council Election : अरे देवा! आता भाजप-काँग्रेसची युती? जळगावात नवा राजकीय प्रयोग
दरम्यान, स्वीकृत नगरसेवक पदाचे उमेदवार ताज राणा यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे. दुसरीकडे, भाजप-एमआयएम युतीस कारणीभूत ठरल्याचा आरोप असलेले आमदार प्रकाश भारसाकळे आणि शहराध्यक्ष हरीश टावरी यांच्यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम यांच्यातील संबंधांबाबत पुन्हा संशय आणि चर्चा तीव्र झाल्या असून, या प्रकरणावर भाजपची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








