Rahul Gandhi : जिथे भाजपला पराभव दिसतो, तिथे मतदारच गायब केले जातात

Rahul Gandhi serious allegation, direct finger at Election Commission : राहुल गांधींचा गंभीर आरोप, निवडणूक आयोगावर थेट बोट

New Delhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादी विशेष पुनरावलोकन म्हणजेच ‘एसआयआर’ (SIR) प्रक्रियेवरून पुन्हा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. ज्या-ज्या ठिकाणी भाजपला आपला पराभव स्पष्टपणे दिसतो, त्या-त्या ठिकाणी मतदारांना पद्धतशीररीत्या मतदार यादीतून वगळले जात असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. या आरोपांना दुजोरा देण्यासाठी त्यांनी संबंधित प्रक्रियेची काही कागदपत्रेही सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “जिथे जिथे SIR, तिथे तिथे मतचोरी. गुजरातमध्ये SIR च्या नावाखाली जे काही सुरू आहे, ती कोणतीही साधी प्रशासकीय प्रक्रिया नसून ती पूर्णपणे सुनियोजित, संघटित आणि धोरणात्मक मतचोरी आहे.” त्यांनी स्पष्ट शब्दांत आरोप केला की, मतदार यादीतून नावे हटवण्यामागे लोकशाहीला कमकुवत करण्याचा आणि निवडणूक निकालांवर प्रभाव टाकण्याचा उद्देश आहे.

Chandrashekhar Bawankule : निधी खर्चाचा वेग मंदावला; लोकप्रतिनिधींच्या नाराजीनंतर पालकमंत्र्यांनी प्रशासनावर ढकलले

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरही कठोर टीका केली. “SIR प्रक्रियेला ‘एक व्यक्ती, एक मत’ या घटनात्मक अधिकाराचा बळी देणाऱ्या शस्त्रात रूपांतरित करण्यात आले आहे. यामागचा हेतू स्पष्ट आहे जनतेऐवजी भाजपा ठरवेल की सत्तेत कोण राहणार. सर्वात गंभीर बाब म्हणजे निवडणूक आयोग आता लोकशाहीचा निष्पक्ष रक्षक उरलेला नसून, या कथित मतचोरीच्या कटाचा मुख्य भाग बनला आहे,” असे त्यांनी म्हटले.

दरम्यान, गुजरात काँग्रेसने जिल्हानिहाय याद्या ‘एक्स’वर प्रसिद्ध करत SIR प्रक्रियेतील कथित अनियमिततेकडे लक्ष वेधले आहे. काँग्रेसचा आरोप आहे की, राहुल गांधींनी मतचोरीचा मुद्दा समोर आणल्यानंतर भाजपाने ‘निवडणूक चोरी’चे अधिक प्रगत मॉडेल राबवण्यास सुरुवात केली आहे. मतदानाचा अधिकार हिरावून घेणे म्हणजेच निवडणूक चोरी असून, त्याचे नवे स्वरूप गुजरातमध्ये दिसून येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Akola Municipal Corporation : अकोल्यात भाजपचे ‘युवा कार्ड’! २५ वर्षीय नितू जगताप महापौरपदाच्या शर्यतीत

नियमानुसार, SIR प्रक्रियेनंतर निवडणूक आयोगाने मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करून आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि १८ जानेवारी ही अंतिम तारीख जाहीर करण्यात आली होती. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, १५ जानेवारीपर्यंत अत्यल्प आक्षेप दाखल झाले होते. मात्र त्यानंतर अचानक एका ठराविक कटाअंतर्गत लाखो आक्षेप, म्हणजेच फॉर्म ७, मोठ्या प्रमाणावर जमा करण्यात आले. या अचानक वाढलेल्या आक्षेपांमुळे मतदार यादीतून मोठ्या संख्येने नावे वगळण्याचा मार्ग मोकळा करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे गुजरातसह देशभरात SIR प्रक्रियेची पारदर्शकता, निवडणूक आयोगाची भूमिका आणि मतदारांच्या घटनात्मक अधिकारांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

__