rohit-pawar-ajit-pawar-plane-crash-suspicion-pilot-change-transponder-off : इस्त्रायली गुप्तचर संघटनेचा दाखला देत रोहित पवारांचे गंभीर प्रश्न
Mumbai: मुंबईतील विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर हा अपघात होता की नियोजित घातपात, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत असतानाच आता आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर गंभीर संशय व्यक्त करत एकामागून एक सवाल उपस्थित केले आहेत. अजित पवार यांचा मूळ प्रवास कारने करण्याचा होता, मात्र आदल्या रात्री अचानक त्यांचा वेळ मुंबईत कसा अडकवण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी घाईगडबडीत विमानप्रवास करण्याचा निर्णय कसा झाला, यामागे काही नियोजन होतं का, याचा तपास व्हावा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी सांगितलं की, ऐनवेळी अजित पवार यांच्या विमानाचे दोन्ही पायलट का बदलण्यात आले, हा मोठा प्रश्न आहे. तसेच व्हीएसआर कंपनीच्या या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कोणी दिलं, त्याचा तपशील आणि अहवाल अद्याप सार्वजनिक का करण्यात आलेला नाही, याबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली. 28 जानेवारी रोजी झालेल्या या दुर्घटनेनंतर तब्बल 13 ते 14 दिवस उलटूनही ठोस तपास झालेला दिसत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
विमान अपघाताच्या वेळी पायलटने ‘मेडे कॉल’ का दिला नाही, विमानाचा ट्रान्सपाँडर बंद का होता, पायलटला मुद्दाम अपघात घडवायचा होता का, असे थेट प्रश्न रोहित पवार यांनी विचारले. या अपघाताची चौकशी केवळ देशांतर्गत संस्थांनीच नव्हे तर फ्रान्स किंवा अमेरिकेतील स्वतंत्र तपास संस्थांनीही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
अजित पवारांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करताना रोहित पवार यांनी इस्त्रायलच्या गुप्तचर संघटनेवर प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचा दाखलाही दिला. एखाद्या प्रभावशाली नेत्याचा अंत करायचा असेल तर थेट लक्ष्य न करता त्याच्या आजूबाजूच्या यंत्रणेला लक्ष्य केलं जातं, असा उल्लेख त्या पुस्तकात असल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवारांच्या अपघातात असाच काही प्रकार घडला आहे का, याचा तपास व्हावा, अशी त्यांनी मागणी केली.
Cabinet meeting : मंत्रिमंडळाचा धडाका; एका बैठकीत 19 महत्त्वाचे निर्णय !
रोहित पवार यांनी आणखी एक दावा करत सांगितलं की, पूर्व विदर्भातील एका नेत्याने अजित पवार यांच्याकडे एका महत्त्वाच्या फाईलवर तातडीने सही करण्याचा आग्रह धरला. ती फाईल घरी असल्याने मंत्रालयात ये-जा करण्यात बराच वेळ गेला. त्याच दिवशी त्यांच्या पक्षातील एक वरिष्ठ नेता भेटीसाठी उशिरा आल्याने कारने जाण्याचा बेत बदलून दुसऱ्या दिवशी सकाळी विमानाने प्रवास करण्याचा निर्णय झाला. हे सगळं योगायोग होतं की ठरवून केलेलं नियोजन, याचा तपास झाला पाहिजे, असं रोहित पवार म्हणाले.
काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी प्लास्टिकच्या बाटल्या वापरणं थांबवून काचेच्या बाटलीतून पाणी पिण्यास सुरुवात केली होती आणि ती बाटली नेहमी विश्वासू सुरक्षारक्षकाकडेच असायची, असाही दावा रोहित पवार यांनी केला. त्यांनी असं का केलं, त्यांना आधीच काही संशय किंवा कुणकुण लागली होती का, हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
अपघाताचा तपशील देताना रोहित पवार यांनी सांगितलं की, अजित पवार यांना अवघ्या 210 किलोमीटरचा प्रवास करायचा होता, जो सुमारे 27 मिनिटांचा होता. ते ज्या लेअरजेट विमानातून प्रवास करत होते ते व्हीएसआर कंपनीचं असून हे विमान 16 वर्षांपूर्वीचं होतं. अजित पवार सकाळी 7.50 वाजता विमानतळावर पोहोचले, 8.10 वाजता विमानाने उड्डाण केलं आणि 8.43 ते 8.45 दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.
विमान कंपनीकडून अपघात धुक्यामुळे झाल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्ष घटनास्थळी परिस्थिती वेगळी असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं. विमान खाली येताना एका बाजूला कलल्याचं आणि त्यानंतर स्फोट झाल्याचं स्पष्ट दिसत असल्याचा त्यांचा दावा आहे.
या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी विमानात नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला होता, मेकॅनिकल फेल्युअर झालं होतं का, टेकऑफपूर्वी विमानाची तपासणी झाली होती का, टेकलॉग आणि एअरवर्थी रिपोर्ट कुठे आहेत, रूटीन आणि हेव्ही मेंटेनन्स कधी आणि कोणी केलं, हँगरमधील सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
Sunetra Pawar : दादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, पण…; सुनेत्रा पवारांची मंत्रिमंडळ बैठकीत एन्ट्री;
याच व्हीएसआर कंपनीच्या विमानाचा दोन वर्षांपूर्वीही अपघात झाला होता, मात्र त्याचा अहवाल आजपर्यंत समोर आलेला नाही. तो अहवाल दाबण्यात आला का, असा सवाल उपस्थित करत योग्य वेळी तपास झाला असता तर आज अजित पवारांचा अपघात टाळता आला असता, असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल, पारदर्शक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चौकशी झाली पाहिजे, अन्यथा सत्य कधीच समोर येणार नाही, अशी ठाम भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे.
___








