Ajit pawar plane crash : अजित पवार विमान दुर्घटनेतील ब्लॅक बॉक्स आगीत जळाला

ajit-pawar-plane-crash-black-box-damage-aaiib-update : डेटा पुनर्प्राप्तीला आव्हान, तपासासाठी परदेशी तांत्रिक मदत मागवली

Mumbai : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला जवळपास तीन आठवडे पूर्ण होत असताना तपासातील महत्त्वाचा दुवा मानल्या जाणाऱ्या ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. एअर एक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर उच्च तापमानाचा गंभीर परिणाम झाला असून ते दीर्घकाळ आगीत राहिल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अपघाताच्या तपासात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दुर्घटनेनंतर घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हेच तपासाचे मुख्य आधार मानले जातात. मात्र हे दोन्ही उपकरणे जळालेल्या अवस्थेत असल्याने त्यातील माहिती पुनर्प्राप्त करण्याचे काम अत्यंत गुंतागुंतीचे ठरत आहे. संबंधित देशात विमानाची निर्मिती झाल्याने त्या देशातील अधिकृत प्रतिनिधींची मदत मागवण्यात आली असून ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. तज्ज्ञांच्या सहाय्याने डेटा रिकव्हर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Nagpur Municipal Corporation : नागपूर महापालिकेचे भूखंड होणार ‘फ्री होल्ड’; हजारो मालकांना मिळणार कायमस्वरूपी मालकी हक्क

ब्लॅक बॉक्समध्ये दोन स्वतंत्र उपकरणे असतात. फ्लाइट डेटा रेकॉर्डर हे विमानाची गती, उंची, इंजिनची स्थिती, पायलटचे नियंत्रण आदेश आणि ऑटो-पायलटची स्थिती यांसारख्या तांत्रिक बाबींची अचूक नोंद ठेवते. अपघाताच्या काही क्षणांपूर्वी विमानात नेमके काय घडले, याचा तपशील या उपकरणातून मिळतो. तर कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर पायलट आणि सह-पायलटमधील संभाषण, एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेला संवाद, अलार्म आणि चेतावणीचे आवाज तसेच अपघातापूर्वीची परिस्थिती रेकॉर्ड करतो. मानवी चुका किंवा तांत्रिक बिघाड यांचा उलगडा करण्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असते.

Mahayuti Government : खामगावात करवाढीचा ‘शॉक’; जनतेचा संताप, विरोधक गायब?

२८ जानेवारी रोजी सकाळी मुंबईहून बारामतीकडे जात असताना लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. २९ जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यांच्या अकाली निधनामुळे राज्यभरातून शोक व्यक्त करण्यात आला होता.

दरम्यान, प्राथमिक तपास अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मात्र ब्लॅक बॉक्समधील डेटा पूर्णपणे मिळेपर्यंत अंतिम निष्कर्ष काढणे कठीण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. आता परदेशी तांत्रिक मदतीनंतर कितपत माहिती पुनर्प्राप्त होते आणि अपघाताचे नेमके कारण काय समोर येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

___