sudhir-mungantiwar-letter-cm-devendra-fadnavis-cotton-msp-deadline-extension : : कापूस खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी
Chandrapur : माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०२५-२६ हंगामातील कापूस खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली २७ फेब्रुवारी २०२६ ही अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा (एमएसपी) लाभ मिळावा आणि अतिवृष्टीमुळे उशिरा सुरू झालेल्या काढणीमुळे कोणीही वंचित राहू नये, या उद्देशाने त्यांनी पत्राद्वारे तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे. यासोबतच सीसीआय मुंबईचे चेअरमन ललितकुमार गुप्ता यांच्याकडेही निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
सन २०२५-२६ हंगामातील कापूस खरेदीसाठी जाहीर करण्यात आलेली २७ फेब्रुवारी २०२६ ही अंतिम मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढवावी, अशी मागणी करत माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले आहे. राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
Sudhir Mungantiwar : शिवकार्याचा जागर अन् मुनगंटीवारांचे ऐतिहासिक उपक्रम
भारतीय कपास निगम लिमिटेडकडून (सीसीआय) किमान आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेअंतर्गत कापूस खरेदीची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी २०२६ जाहीर करण्यात आली आहे. कपास किसान ॲपवर नोंदणीकृत शेतकऱ्यांना या तारखेपूर्वी स्लॉट बुक करून जवळच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, राज्यातील काही भागांत अतिवृष्टीमुळे शेतीत अद्याप ओलावा कायम असून कापूस वेचणीस उशीर होत असल्याची परिस्थिती समोर आली आहे.
Sudhir mungantiwar : शेतकऱ्यांच्या घामाचा द्या दाम,२० हजार बोनसवर मुनगंटीवार ठाम !
चंद्रपूर जिल्ह्यासह काही भागांत यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कापूस पिकाची काढणी विलंबाने सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरी अद्याप कापूस आलेला नसल्याने ते एमएसपीचा लाभ घेऊ शकत नाहीत, अशी तक्रार करण्यात आली आहे. कृषी मूल्य आयोगाचे सदस्य बंडू मधुकर भौरकर यांनी यासंदर्भात निवेदन दिले असून त्यानंतर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत मुदतवाढ देण्याची मागणी केली असून मुदत वाढीसाठी पाठपुरावा करत आहेत.
पत्रात नमूद केल्यानुसार, शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचा लाभ मिळावा यासाठी सीसीआयमार्फत खरेदीची मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत वाढविणे आवश्यक आहे. अन्यथा अनेक शेतकरी एमएसपीपासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. संबंधित विभागांना तातडीने निर्देश देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी विनंतीही पत्रातून करण्यात आली आहे.
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून आता मुख्यमंत्र्यांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे. मुदतवाढीबाबत लवकरच निर्णय जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.








