Ashok kharat : धार्मिक विधीच्या नावाखाली अत्याचार, राजकीय वर्तुळात खळबळ !

ashok-kharat-nashik-crime-sexual-assault-58-videos-political-links-exposed : नाशिकमध्ये ‘कॅप्टन’ अशोक खरातचा काळा कारनामा

Nashik : स्वतःला अंकशास्त्रज्ञ आणि ‘कॅप्टन’ म्हणून सादर करत प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्कात राहणाऱ्या अशोक खरात याच्या विरोधात गंभीर गुन्हा नोंद झाल्यानंतर नाशिकसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. धार्मिक विधीच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून, या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.

पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, पीडित महिलेने आरोपी अशोक खरात याने धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने तिला विश्वासात घेतले आणि नंतर गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.

सातारा ते अकोला धक्कादायक प्रकारांनी उघडली शिक्षण व्यवस्थेची दयनीय अवस्था

तपासादरम्यान या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब समोर आली असून, अशोक खरात याच्या कार्यालयातून तब्बल ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागले आहेत. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला, सेलिब्रिटी तसेच प्रभावशाली व्यक्तींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या व्हिडिओंच्या आधारे आरोपी ब्लॅकमेल करत होता का, तसेच अशाच प्रकारचे गुन्हे वारंवार घडले का, याचा तपास पोलीस करत आहेत.

नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरात अशोक खरात याने आपले कार्यालय थाटले होते. येथे धार्मिक विधी, भविष्यकथन आणि अंकशास्त्राच्या नावाखाली अनेक लोकांची वर्दळ असायची. या ठिकाणीच एका महिलेवर अत्याचार करतानाचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित व्हिडिओ अत्यंत आक्षेपार्ह असल्याने तो सार्वजनिक करण्यात आलेला नसला तरी या पुराव्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले असून, अनेक राजकीय नेते आणि प्रभावशाली व्यक्ती अशोक खरातच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांचा पाद्यपूजेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. याशिवाय मुख्यमंत्री पदावर असताना एकनाथ शिंदे, तसेच राधाकृष्ण विखे पाटील आणि दीपक केसरकर यांनीही खरातच्या दरबाराला भेट दिल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना रूपाली चाकणकर यांनी आपण सामाजिक कार्याच्या निमित्ताने संबंधित ट्रस्टशी जोडले गेलो होतो आणि खरात यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती नव्हती, असे स्पष्ट केले आहे. मात्र, याच प्रकरणावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप करत, एक वर्षापूर्वीच या प्रकरणाची माहिती असूनही कारवाई का झाली नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.

याशिवाय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या प्रकरणावर भाष्य करत, अशोक खरात याच्याविषयी मोठ्या प्रमाणात माहिती समोर येत असून लवकरच आणखी खुलासे होणार असल्याचे संकेत दिले आहेत.

Vikas Thakre : न्यायालयाच्या आदेशांना धाब्यावर बसवून झोपडपट्ट्यांवर बुलडोझर; विकास ठाकरेंनी प्रशासनाला झोडपले!

अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील शिवनिका ट्रस्टशी संबंधित असून, मर्चंट नेव्हीमध्ये सुमारे २२ वर्षे सेवा केल्याचा दावा केला जातो. स्वतःला अंकशास्त्रज्ञ म्हणून सादर करत तो दरबार भरवत असे आणि त्याच्या संपर्कात अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटी असल्याचे सांगितले जाते. सिन्नर परिसरातील ईशानेश्वर मंदिराजवळ त्याचे आलिशान फार्महाऊस असल्याची माहितीही समोर आली असून, त्या ठिकाणी व्हीआयपी भेटी होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे भोंदूबाबांच्या वाढत्या प्रभावाबाबत पुन्हा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. धार्मिक श्रद्धेच्या नावाखाली लोकांची फसवणूक आणि शोषण होत असल्याचे स्पष्ट होत असून, या प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, पुढील काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.