व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Lanke Vs Vikhe : खा. निलेश लंकेंचा विखे पाटील कुटुंबावर १०० कोटींच्या...

Lanke Vs Vikhe : खा. निलेश लंकेंचा विखे पाटील कुटुंबावर १०० कोटींच्या व्यवहारांचा गंभीर आरोप!

nilesh-lanke-allegations-vikhe-patil-family-zr2-bio-energy-100-crore-dubai-connection : श्रीरामपूरमधील ४ हजार एकर जमीन, दुबई कनेक्शन आणि बायो एनर्जी कंपनीवर संशय

Ahilyanagar : श्रीरामपूर तालुक्यातील जमीन व्यवहार आणि झेड आर 2 बायो एनर्जी कंपनीच्या आर्थिक उलाढालीवरून राज्यातील राजकारण तापले असून, खासदार निलेश लंके यांनी गंभीर आरोप करत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कुटुंबीयांवर थेट निशाणा साधला आहे. या प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालय ईडी आणि केंद्रीय अन्वेषण विभाग – सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना निलेश लंके यांनी दावा केला की, श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे ४ हजार एकर शेती महामंडळाची जमीन खाजगी कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरू होती. या जमीन व्यवहारामागे राजकीय हस्तक्षेप असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी तीन मंत्र्यांची समिती स्थापन करण्यात आल्याचेही सांगितले. संबंधित कंपनीच्या खात्यात अवघ्या एका महिन्यात १०० कोटी रुपये जमा झाल्याचा आरोप करत हा पैसा हवाला मार्गाने आला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

Ashok kharat : धार्मिक विधीच्या नावाखाली अत्याचार, राजकीय वर्तुळात खळबळ !

पुढे बोलताना लंके यांनी सांगितले की, झेड आर 2 ग्रुप होल्डिंग कंपनी दुबईत नोंदणीकृत असून तिचे कार्यालय मुंबईत आहे. या कंपनीने ६१ टक्के शेअर्स खरेदी केले असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, या कंपनीचे आणि प्रवरा बायो एनर्जी कंपनीचे संचालकांमध्ये संबंध असल्याचे सांगत त्यांनी सुप्रिया राधाकृष्ण विखे पाटील आणि अजित नामदेवराव ढोकणे यांची नावे घेतली. अजित ढोकणे हे राधाकृष्ण विखे पाटील यांचे जावई असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

लंके यांनी पुढे आरोप केला की, संबंधित सर्व कंपन्या एकाच पत्त्यावर नोंदणीकृत असून व्यवहार संशयास्पद आहेत. बायो एनर्जी कंपनी ही बनावट असल्याचा दावा करत त्यांनी या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला. कंपनीच्या व्यवहारात परदेशी नागरिकांचाही सहभाग असल्याचे सांगत जिमी वॉल्सन आणि निलेश जैन यांचा उल्लेख त्यांनी केला.

या संपूर्ण प्रकरणात शीतल पुरव यांनी कंपनीच्या सचिव पदाचा राजीनामा दिल्याचा उल्लेख करत, अनियमितता झाल्याचा आरोपही लंके यांनी केला. तसेच, सुनील कलापुरे यांचे नावही या व्यवहारात समोर येत असल्याचे त्यांनी सांगितले.

सातारा ते अकोला धक्कादायक प्रकारांनी उघडली शिक्षण व्यवस्थेची दयनीय अवस्था

या आरोपांमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, जमीन व्यवहार, परदेशी गुंतवणूक आणि राजकीय संबंध यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या आरोपांवर राधाकृष्ण विखे पाटील किंवा संबंधित कुटुंबीयांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

error: Content is protected !!