Ashok kharat case : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; आर्थिक गैरव्यवहार ईडीची चौकशी!

ashok-kharat-ed-probe-nashik-crime-black-money-investigation : लैंगिक अत्याचार आणि काळ्या पैशांच्या जाळ्याचा उलगडा

Nashik : भोंदूबाबा म्हणून ओळखला जाणारा अशोक खरात याच्या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून आता या प्रकरणाला आर्थिक गुन्ह्यांचा मोठा पैलू जोडला जाण्याची शक्यता आहे. विशेष तपास पथकाकडून सुरू असलेल्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, खरातच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी अंमलबजावणी संचालनालयाकडून होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास आणखी व्यापक स्वरूप धारण करण्याची चिन्हे आहेत.

सध्या अशोक खरात याची विशेष तपास पथकाकडून कसून चौकशी सुरू असून त्याच्याविरोधात आतापर्यंत एकूण दहा गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी आठ गुन्हे महिलांवरील लैंगिक अत्याचारासंदर्भात तर दोन गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. तपासादरम्यान अनेक महिलांनी पुढे येत गंभीर आरोप केले असून, त्याने मानसशास्त्रीय पद्धतीने महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.

Vijaypat singhania : रेमंडला जागतिक उंचीवर नेणारे उद्योगपती विजयपत सिंघानिया यांचे निधन

चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात महिलांशी गोड बोलून, त्यांची स्तुती करून आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील कमकुवत बाजू ओळखून त्यांचा विश्वास संपादन करत असे. “तू खूप सुंदर आहेस”, “तुझा पती तुला समजून घेत नाही” अशा संवादातून तो भावनिक जवळीक निर्माण करत असल्याचे पीडितांनी सांगितले आहे. स्वतःला ‘माइंड रीडिंग’मध्ये पारंगत असल्याचा आव आणून तो समोरच्या व्यक्तीच्या भावना ओळखत असल्याचा भास निर्माण करत असे.

दरम्यान, विशेष तपास पथकाने नाशिकमधील कॅनडा कॉर्नर परिसरातील त्याच्या कार्यालयाची सखोल तपासणी केली. या तपासात त्याच्या केबिनमध्ये बसवण्यात आलेल्या अत्यंत उच्च दर्जाच्या गडद काचांनी तपास अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. या काचांमुळे बाहेरून आत काय चालले आहे हे पूर्णपणे दिसत नसल्याचे स्पष्ट झाले असून, याचाच फायदा घेत त्याने महिलांवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आर्थिक गैरव्यवहारांच्या दृष्टीने पाहता, अशोक खरात याने हवाला रॅकेट आणि व्याजाच्या धंद्यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचे काही वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक आणि राजकीय व्यक्तींशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काळा पैसा जमा करून तो व्याजाने देणे आणि हवाला मार्गाने देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण केल्याचेही प्राथमिक तपासात समोर आले आहे. या सर्व व्यवहारांचा सविस्तर अहवाल लवकरच अंमलबजावणी संचालनालयाकडे पाठवला जाण्याची शक्यता आहे.

Sudhir mungantiwar : चमन मेटॅलिक्सची मुजोरी खपवून घेणार नाही, सुधीर मुनगंटीवारांचा कंपनीला फायनल इशारा!

आज अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असून त्याला नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. नव्याने उघड झालेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर त्याची कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी पक्षाकडून केली जाण्याची शक्यता आहे. तपासादरम्यान हाती लागलेले पुरावे आणि धक्कादायक माहिती न्यायालयात सादर केली जाऊ शकते. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या प्रकरणातील वाढत चाललेली व्याप्ती आणि उघड होत असलेले आर्थिक व्यवहार लक्षात घेता, अशोक खरात आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींवर पुढील काळात कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.