malkapur-buldhana road work stalled due to politics : ‘भोसले’ यांच्या दारावर अडला रस्ता; नागरिकांचा संयम सुटण्याच्या मार्गावर
Malkapur मलकापूर ते बुलढाणा दरम्यानचा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आजही रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या कामाबाबत घोषणा आणि आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात काम सुरू होत नसल्याने हा मुद्दा आता राजकीय रंग घेऊ लागला आहे. अरुंद रस्त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका आणि नागरिकांचा वेळ वाया जात असल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नुकत्याच करवंड येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार श्वेता महाले यांनी या प्रश्नाला पुन्हा एकदा उजाळा देत राज्य सरकारवर अप्रत्यक्ष टीका केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे त्यांनी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. “रस्ता मंजूर, निधी उपलब्ध, पण प्रत्यक्ष कामाला सुरुवात नाही,” अशी परिस्थिती त्यांनी अधोरेखित केली.
या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात असताना, प्रत्यक्षात कामाला सुरुवात होत नसल्याने ‘पैसा आहे, पण मार्ग नाही’ अशी विसंगती स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनातील समन्वयाचा अभाव आणि निर्णयक्षमतेतील ढिलाई यावर तीव्र प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेषतः स्थानिक पातळीवर जनतेला दिलेल्या आश्वासनांवर विश्वास ठेवायचा की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Manoj Kayande : मनोज कायंदेच्या बारामती दौऱ्यामागे राजकीय स्ट्रॅटेजी?
दरम्यान, या प्रकल्पातील प्रमुख अडथळा म्हणून टोल कंत्राटाचा मुद्दा पुढे येत आहे. कंत्राटी प्रक्रियेमधील अडचणी, धोरणात्मक निर्णयांचा विलंब आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव यामुळे हा प्रकल्प रखडल्याचे बोलले जात आहे. यामुळेच राजकीय पातळीवर एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचे प्रकारही वाढू लागले आहेत.
मलकापूर-बुलढाणा मार्गाचे रुंदीकरण हे केवळ विकासकाम न राहता आता राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनले आहे. नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेला हा प्रश्न लवकर निकाली काढण्याची मागणी होत आहे.








