Internal rift deepens in Shivsena; chaos erupts during a meeting in Deulgaon Raja : देऊळगाव राजात बैठकीत गोंधळ; काकड यांचा माजी पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल, कारवाईची मागणी
Deulgaoraja शिवसेना पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उफाळून आले असून, “दिवसभर विरोधकांच्या गळ्यात गळे घालणाऱ्यांनी पक्षनिष्ठेचे धडे शिकवू नयेत,” असा इशारा शिवसेना पदाधिकारी सुदाम काकड यांनी दिला आहे. अलीकडील बैठकीत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी माजी पदाधिकाऱ्यांवर थेट निशाणा साधत पक्षातील शिस्त आणि निष्ठेबाबत कठोर भूमिका मांडली.
काकड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ४ एप्रिल २०२६ रोजी अमरावती येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून पश्चिम विदर्भासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात प्रत्येक बूथवर दोन ‘बूथ लेव्हल एजंट’ नेमण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार १५ एप्रिल रोजी देऊळगाव राजा येथील वृंदावन हॉटेलमध्ये आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बुलढाणा लोकसभा संपर्क प्रमुख संजय सोनार यांनी तालुक्यातील सर्व ३४० बूथवर एजंट नियुक्ती पूर्ण झाल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
मात्र, या शिस्तबद्ध बैठकीदरम्यान काही पदमुक्त माजी पदाधिकारी दीपक बोरकर आणि अनिल चिते यांनी कोणतेही निमंत्रण नसताना कार्यकर्त्यांसह उपस्थित राहून घोषणाबाजी करत गोंधळ घातल्याचा आरोप काकड यांनी केला. संबंधितांनी बैठकीच्या कामकाजात व्यत्यय आणत स्टेजवर जाण्याचाही प्रयत्न केला. उपस्थित नेत्यांनी त्यांना शांततेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी तो नाकारल्याचेही काकड यांनी स्पष्ट केले.
काकड यांनी पुढे आरोप केला की, संबंधित व्यक्तींनी यापूर्वीही निवडणुकांमध्ये पक्षविरोधी भूमिका घेतली होती. “शरीराने शिवसेनेत आणि मनाने विरोधकांसोबत” अशी भूमिका घेत अधिकृत उमेदवारांविरोधात काम केल्यामुळे पक्षाला फटका बसला. तसेच, पदावर असताना संघटनात्मक काम न करता केवळ वैयक्तिक फायद्यासाठी पदाचा वापर केल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
या पार्श्वभूमीवर, पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या आणि शिस्तभंग करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई करून कायमस्वरूपी निलंबनाची मागणी करण्यात आली आहे. शहर व तालुका पदाधिकाऱ्यांनी ही मागणी लोकसभा संपर्क प्रमुखांकडे केली असून, पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते याकडे स्थानिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
Khadse vs wagh : रोहिणी खडसे आणि चित्रा वाघ यांच्यात सोशल मीडियावरून पुन्हा शब्दयुद्ध!
या घटनेमुळे देऊळगाव राजा तालुक्यातील शिवसेनेतील गटबाजी पुन्हा ऐरणीवर आली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन मजबूत करण्याच्या प्रयत्नांना या वादाचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या पत्रकार परिषदेला उपजिल्हाप्रमुख दिनकर खरात, शहरप्रमुख गोपाळ व्यास, युवासेना तालुकाप्रमुख अमोल काकड, स्वप्नील शहाणे, नगरसेवक काशीफ कोटकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.








