west-bengal-election-result-2026-bjp-surge-amit-shah-prediction-mamata-banerjee-setback : ममता बॅनर्जींचा किल्ला ढासळण्याचा मार्गावर
New Delhi : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाने देशाच्या राजकारणात मोठा भूकंप घडवला असून, दीर्घकाळ अभेद्य मानला जाणारा ममता बॅनर्जी यांचा गड ढासळण्याच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. जवळपास १५ वर्षे सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत मोठा धक्का बसताना दिसत असून भारतीय जनता पक्षाने प्रथमच बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने निर्णायक झेप घेतली आहे.
मतमोजणीच्या सध्याच्या कलानुसार, २९४ जागांपैकी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या १४८ जागांच्या पुढे जात भाजपने १५७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस केवळ ११५ जागांवर आघाडीवर असून, उर्वरित जागांवर इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांची स्थिती मर्यादित आहे. या आकडेवारीमुळे बंगालमध्ये सत्तांतर जवळपास निश्चित मानले जात आहे.
यापूर्वी २०१६ आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावूनही ममता बॅनर्जी यांनी आपला किल्ला अबाधित ठेवला होता. मात्र, यंदा भाजपने ‘कुठल्याही परिस्थितीत बंगाल जिंकायचाच’ हा निर्धार करून रणनिती आखली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचाराच्या काळात पश्चिम बंगालमध्ये वारंवार दौरे करत संघटनात्मक बांधणी मजबूत केली होती. त्यांनी पहिल्याच टप्प्यानंतर भाजपच्या मोठ्या विजयाचे भाकीत केले होते आणि ते आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे.
२४ एप्रिल रोजी झालेल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर अमित शाह यांनी भाजपला १७० जागांपर्यंत विजय मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला होता. तसेच पहिल्या टप्प्यातील १५२ जागांपैकी ११० जागा भाजप जिंकेल, असेही त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या विधानाला सुरुवातीला राजकीय प्रतिक्रिया मिळाल्या होत्या, मात्र सध्याच्या कलांवरून हे भाकीत वास्तवात उतरत असल्याचे दिसून येत आहे.
Rahuri by election : “राहुरीत कमळाची आघाडी भक्कम; विरोधक मोठ्या पिछाडीवर
या निवडणुकीसाठी भाजपने आपली संपूर्ण संघटनात्मक ताकद बंगालमध्ये झोकून दिली होती. मतदान प्रक्रियेदरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे दोन लाख सीआरपीएफ जवानांची तैनाती करण्यात आली होती. तसेच निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील बदलही या निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा ठरला. निवडणूक आयोगाच्या विशेष मोहिमेत लाखो मतदारांची नावे वगळण्यात आल्याने राजकीय वर्तुळात त्यावरून मोठी चर्चा रंगली होती.
सध्याच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये प्रथमच भाजपची सत्ता येण्याची शक्यता प्रबळ झाली असून, यामुळे राष्ट्रीय राजकारणातही मोठे परिणाम होण्याची चिन्हे आहेत. ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा पराभव केवळ राजकीय धक्का नसून त्यांच्या दीर्घकालीन वर्चस्वाला मोठे आव्हान मानले जात आहे. दुसरीकडे भाजपसाठी हा विजय केवळ एका राज्यातील सत्ता बदल नसून पूर्व भारतात विस्ताराच्या दृष्टीने ऐतिहासिक टप्पा ठरत आहे.
___








