व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Women commission : महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माजी आयपीएसची एन्ट्री?

Women commission : महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माजी आयपीएसची एन्ट्री?

women-commission-chairperson-meera-borwankar-likely-appointment : मीरा बोरवणकर यांचे नाव चर्चेत, हालचालींना वेग

Mumbai : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी सध्या मोठ्या घडामोडी सुरू असल्याचे संकेत मिळत असून माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांच्या नावाची जोरदार चर्चा राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद दीर्घकाळापासून रिक्त आहे आणि अद्याप सरकारकडून नव्या नियुक्तीबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त राहणे ही गंभीर बाब मानली जात आहे. अशा परिस्थितीत या पदावर अनुभवी आणि कठोर प्रशासकीय पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर मीरा बोरवणकर यांचे नाव पुढे येत असून त्या या पदासाठी आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

मीरा बोरवणकर या राज्यातील कर्तव्यदक्ष आणि तडफदार आयपीएस अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली असून मुंबई गुन्हे शाखेचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची उकल करण्यात आली असून प्रशासनात त्यांची ठाम आणि निर्णयक्षम अधिकारी अशी प्रतिमा आहे.

Bjp big win : पाच राज्यांच्या निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट, पहा ए टू झेड आकडेवारी !

या नियुक्तीच्या चर्चेला आणखी बळ मिळण्यामागे सामाजिक कार्यकर्त्यांकडून आलेल्या मागण्या देखील कारणीभूत ठरत आहेत. महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अनुभवी माजी आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. त्यानंतर या पदासाठी अशा प्रकारच्या नावांवर विचार सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, मीरा बोरवणकर यांनी अलिकडेच ‘मॅडम कमिशनर’ हे आत्मकथनपर पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या सेवाकाळातील अनुभव मांडताना काही राजकीय हस्तक्षेपांवर भाष्य केल्याची चर्चा झाली होती. त्यामुळे त्यांच्या स्पष्टवक्तेपणाची आणि निर्भीड भूमिकेची पुन्हा चर्चा रंगली होती.

Assembly election results : “पाच राज्यांच्या निकालात भाजपचा राष्ट्रव्यापी दबदबा!

तथापि, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी मीरा बोरवणकर यांच्या नावाबाबत अद्याप सरकारकडून कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. मात्र, लवकरच या पदावर नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राज्यातील महिला सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

error: Content is protected !!