sanjay-raut-nashik-ring-road-land-acquisition-farmers-women-beating-controversy : नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या, अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्यानंतर बावनकुळेंचाही फोन
Nashik : नाशिकमधील प्रस्तावित रिंग रोडसाठी सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकरी महिलांना झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेने राज्यातील राजकारण तापले आहे. या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेत थेट नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. महिलांच्या अंगावरील जखमा आणि व्रण पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरून जाब विचारत प्रशासनाला फैलावर घेतले. या संपूर्ण घडामोडींमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठा तणाव निर्माण झाला होता.
नाशिक शहरातील ६६ किलोमीटरच्या प्रस्तावित रिंग रोडसाठी मातोरी आणि मुंगसरे परिसरात भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. मोजणीसाठी प्रशासनाचे पथक पोहोचले असताना काही शेतकऱ्यांनी जमिनीच्या संपादनाला विरोध केला. यावेळी पोलिसांकडून महिलांना मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचे व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली.
Nagpur municipal corporation : बसपा नगरसेविका हर्षला जयस्वाल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार
घटनेची माहिती मिळताच संजय राऊत यांनी थेट प्रांताधिकारी पवन दत्ता आणि पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांना फोन करत संताप व्यक्त केला. महिलांवर अशा प्रकारे हात उचलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला, तुमच्या घरात आई-बहिणी नाहीत का, असा संतप्त सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला. माझ्याकडे घटनेचे व्हिडीओ आहेत, ही पद्धत चुकीची असून शेतकऱ्यांवर जबरदस्ती चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
यानंतर संजय राऊत स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांच्या सोबत मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि शेतकरी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट होईपर्यंत कार्यालयातून हलणार नाही, अशी भूमिका घेत राऊत यांनी जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी हेमांगी पाटील यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. मात्र, राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेटीची मागणी कायम ठेवली.
Tamilnadu politics : तामिळनाडूत विजय यांची सत्ता अडचणीत; राज्यपालांनी पुन्हा बहुमताची अट घातली
संजय राऊत यांनी प्रांताधिकारी पवन दत्ता यांच्यावरही जोरदार टीका केली. महिलांवरील मारहाणीचे प्रकरण समोर आल्यानंतर अधिकारी घटनास्थळावरून निघून गेल्याचा आरोप त्यांनी केला. इतके गंभीर प्रकरण असताना अधिकारी जबाबदारी टाळत असल्याचा आरोप करत राऊत यांनी या प्रकरणाची तक्रार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे सांगितले. राज्यात नेमके कोणत्या दर्जाचे अधिकारी नियुक्त केले आहेत, हे पंतप्रधानांना सांगणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भूसंपादनाच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा देताना राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही. सीतेसमान माता-भगिनींना मारहाण होत असताना सरकार गप्प बसले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शिवसेनेने आंदोलन छेडल्यास कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि हे आंदोलन शेवटपर्यंत जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
West bengal politics : सुवेंदु अधिकारी यांच्या पीएच्या हत्येमुळे बंगाल हादरला!
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील तणावपूर्ण वातावरण लक्षात घेता सरकारवाडा पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही वेळानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी संजय राऊत यांच्यासोबत चर्चा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यानंतर राज्यातील वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या असून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आता या प्रकरणात प्रशासन नेमकी कोणती कारवाई करते आणि भूसंपादनाचा वाद कोणत्या दिशेने जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
__








