rahul-gandhi-reaction-on-pm-modi-work-from-home-gold-petrol-appeal-marathi-news : “देश चालवणं आता पंतप्रधानांच्या हातात राहिलेलं नाही”
New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यपूर्वेतील युद्ध, वाढती महागाई आणि जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना इंधन बचत, सोने खरेदी टाळणे आणि ‘वर्क फ्रॉम होम’चा अवलंब करण्याचे आवाहन केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. मोदींच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर थेट निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला “उपदेश नव्हे, तर गेल्या १२ वर्षांतील अपयशाचे पुरावे” असे संबोधत मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “मोदीजींनी काल जनतेकडे त्यागाची मागणी केली. सोने खरेदी करू नका, परदेशात जाऊ नका, पेट्रोलचा वापर कमी करा, खते आणि खाद्यतेलाचा वापर कमी करा, मेट्रोने प्रवास करा आणि घरून काम करा, असे सांगितले. हे उपदेश नसून अपयशाचे पुरावे आहेत. १२ वर्षांत देशाला अशा वळणावर आणून ठेवले आहे की, आता जनतेला काय खरेदी करावे, कुठे जावे आणि काय करू नये हे सांगावे लागत आहे.”
PM Modi : ‘हायब्रिड वर्क मॉडेल’ आणि ‘वर्क फ्रॉम होम’चा मोदी मंत्र !
राहुल गांधी यांनी पुढे म्हटले की, “स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी आणि उत्तरदायित्व टाळण्यासाठी प्रत्येक वेळी दोष जनतेवर ढकलला जात आहे. देश चालवणे आता ‘कॉम्प्रमाईज्ड’ म्हणजेच तडजोड केलेल्या पंतप्रधानांच्या हातातील गोष्ट राहिलेली नाही.” राहुल गांधींच्या या विधानामुळे सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथील जनसभेत बोलताना देशवासियांना ऊर्जा बचतीचे महत्त्व समजावून सांगितले होते. मध्यपूर्वेतील युद्ध आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतींचा भारतावर परिणाम होत असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनी इंधनाचा वापर मर्यादित ठेवावा, असे आवाहन केले. तसेच पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला त्यांनी दिला होता.
Sudhir Mungatiwar : राजकारणापलीकडचं नेतृत्व : प्रश्न जनतेचे, लढा मुनगंटीवारांचा
कोरोना काळाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, त्या काळात देशाने ‘वर्क फ्रॉम होम’, ऑनलाइन मीटिंग्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसारख्या पद्धती यशस्वीपणे स्वीकारल्या होत्या. आजही बदलत्या परिस्थितीत त्या व्यवस्थांना पुन्हा प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कंपन्या आणि संस्थांनी शक्य असेल तिथे ‘हायब्रिड वर्क मॉडेल’चा विचार करावा, असेही त्यांनी सूचित केले होते.
पंतप्रधानांनी आपल्या भाषणात खतांच्या वाढत्या जागतिक किंमतींचाही उल्लेख केला. जगभरात खताची गोणी सुमारे ३ हजार रुपयांना मिळत असताना, भारत सरकार तीच गोणी भारतीय शेतकऱ्यांना सुमारे ३०० रुपयांत उपलब्ध करून देत असल्याचा दावा त्यांनी केला. सरकार सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Anjali damania : “रात्री मोठी माहिती हाती आली”; अंजली दमानिया पुन्हा आक्रमक
मात्र, विरोधकांनी पंतप्रधानांच्या या आवाहनाला आर्थिक संकटाची कबुली असल्याचा आरोप केला आहे. वाढती महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्य नागरिक आधीच त्रस्त असल्याचे सांगत काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांच्या प्रतिक्रियेनंतर आता भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.
___








