व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Manoj jarange : “दिल्लीकडे मराठ्यांचा मोर्चा निघालाच तर सरकार हादरेल”

Manoj jarange : “दिल्लीकडे मराठ्यांचा मोर्चा निघालाच तर सरकार हादरेल”

manoj-jarange-patil-maratha-reservation-delhi-march-warning-fadnavis-government : मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, फडणवीस सरकारला थेट इशारा

Mumbai : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा राज्यातील राजकारण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत पुन्हा आंदोलनाची हाक दिली आहे. सरकारने गोड बोलून मराठा समाजाची फसवणूक केली, विश्वासघात केला आणि दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा थेट आरोप जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला. मराठा समाजाच्या मागण्या प्रलंबितच राहिल्याने आता आंदोलनाशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरलेला नसल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत.

आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून सकाळी दहा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील समाजाशी संवाद साधणार असून पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, त्यांनी माध्यमांशी बोलताना मराठा समाज दिल्लीकडे कूच करू शकतो, असे संकेत दिल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधताना आठ महिने उलटून गेले तरी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र का देण्यात आले नाही, असा जळजळीत सवाल उपस्थित केला. हैदराबाद गॅझेट आणि इतर ऐतिहासिक नोंदींच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय झाल्याचे सरकारने जाहीर केले होते. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले.

Ncp political news : सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ राजकीय खलबतं? राष्ट्रवादीत नव्या समीकरणांची जोरदार चर्चा !

सप्टेंबर २०२५ मध्ये मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी मोठे आंदोलन केले होते. त्या आंदोलनावेळी सरकारने मागण्या मान्य केल्याचा दावा करत “आपण जिंकलो” अशी घोषणा देत आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नसल्याचा आरोप आता मराठा समाजातून होत आहे. हैदराबाद गॅझेटनुसार सुमारे ३०८ नोंदी सापडल्या असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ मराठा समाजाला मिळालेला नाही, अशी भावना आंदोलकांमध्ये वाढत आहे.

याशिवाय शिंदे समितीकडून कुणबी नोंदी शोधण्याचे काम जवळपास ठप्प झाल्याचा आरोपही मनोज जरांगे यांनी केला आहे. सरकारकडून वेळकाढूपणा सुरू असून समाजाच्या भावनांशी खेळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आज होणाऱ्या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे. सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये काही तोडगा निघणार की संघर्ष आणखी तीव्र होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या सुरक्षेचं ‘कवच’ होणार भक्कम; मुनगंटीवारांच्या पाठपुराव्याने नवीन पोलीस अधीक्षक कार्यालयाचा मार्ग मोकळा!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अलीकडच्या काळात मनोज जरांगे यांनी सातत्याने टीका केली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत ते सरकारविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतात का, तसेच दिल्लीकडे मोर्चा काढण्याची अधिकृत घोषणा करतात का, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

error: Content is protected !!