I Don’t Want to Stop… Sandeep Joshi’s New Social Media Post After End of Legislative Council Term:राजकीय वर्तुळाचे लक्ष आता संदीप जोशी यांच्या नव्या इनिंगकडे
Nagpur : महिनाभरापूर्वी ‘मला थांबायचे आहे…’ अशी खळबळजनक पोस्ट करून अलीकडच्या संधीसाधू राजकारणावर थेट निशाणा साधणारे भाजपचे नेते आणि माजी आमदार संदीप जोशी यांनी आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर नवी गुगली टाकली आहे. विधान परिषदेचा कार्यकाळ संपून नव्या आमदारांच्या नियुक्त्या झाल्यानंतर जोशी यांनी “मला थांबायचे नाही…” असा नवा सूर लावत राजकीय पद संपलं असलं तरी समाजसेवेचा प्रवास थांबणार नाही, असा भावनिक आणि राजकीयदृष्ट्या सूचक संदेश दिला आहे.
महिनाभरापूर्वी त्यांनी केलेल्या ‘थांबण्याच्या’ पोस्टवरून राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ उडाला होता. अनेकांनी त्यांना पुन्हा विधान परिषदेवर संधी मिळावी म्हणून हा ‘पत्रप्रपंच’ केल्याची टीकाही केली होती, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या अत्यंत जवळच्या मित्राच्या पत्रावर थेट प्रतिक्रिया देण्याचे कौशल्याने टाळले होते. मात्र, आता कार्यकाळ संपताच जोशी यांनी घेतलेली ही नवी भूमिका भाजपमधील अंतर्गत समीकरणांच्या दृष्टीने अत्यंत रंजक मानली जात आहे.
Abhijit sapkal : SIR अभियानासाठी काँग्रेस सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांची राज्य समन्वयकपदी नियुक्ती
संदीप जोशी यांनी आपल्या या ताज्या सोशल मीडिया पोस्टमध्ये विधान परिषदेतील १४ महिन्यांच्या अल्प कालावधीतील प्रवासाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे. हा काळ जरी कमी असला तरी महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याची आणि जनतेच्या हितासाठी काम करण्याची संधी मला मिळाली, हे माझं भाग्य आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.या प्रवासात साथ देणाऱ्या पक्ष नेतृत्वाचे, कार्यकर्त्यांचे, मित्रपरिवाराचे आणि नागरिकांचे विशेष आभार मानताना, जनतेने दाखवलेला विश्वास आणि कार्यकर्त्यांनी दिलेली साथ हीच माझी खरी ताकद आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. पदं येतात-जातात; मात्र समाजासाठी काम करण्याची प्रेरणा कायम असते, असा थेट संदेश देत त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी पुढेही अखंड सुरू राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
Anjali damania : “पार्थ पवार स्वतःलाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा समजू लागले”
आपल्या १४ महिन्यांच्या कार्यकाळात संदीप जोशी यांनी नागपूरसह राज्यातील विविध नागरी, सामाजिक आणि विकासकामांशी संबंधित मुद्दे विधान परिषदेत आक्रमकपणे उपस्थित केले होते, ज्यामुळे अल्प काळातही त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केल्याची भावना त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे. आता नावापुढे ‘माजी आमदार’ ही ओळख लागली असली, तरी जनतेशी असलेला संवाद आणि सेवाभाव यापुढेही पूर्वीइतक्याच ताकदीने सुरू राहील, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला असून, जोशींच्या या नव्या ‘इनिंग’कडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








