anjali-damania-slams-parth-pawar-ncp-mundhwa-land-scam-political-news : अंजली दमानिया यांचा घणाघात, ‘गँग’ आणि जमीन घोटाळ्यावर गंभीर आरोप
Mumbai : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधत राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण केला आहे. पार्थ पवार यांच्या वागणुकीवर आणि पक्षातील वाढत्या प्रभावावर टीका करताना दमानिया यांनी “त्यांच्या डोक्यात हवा गेली असून ते स्वतःलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा समजू लागले आहेत,” असा घणाघाती आरोप केला. तसेच मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवार हेच मुख्य सूत्रधार असल्याचा गंभीर दावाही त्यांनी केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील सध्याच्या घडामोडींवर भाष्य केले. “सध्या पार्थ पवार यांना आपणच पक्षाचे सर्वेसर्वा असल्यासारखे वाटत आहे. अजित पवार यांच्यानंतर पक्षाची धुरा आपणच सांभाळत आहोत, अशी त्यांची मानसिकता झाली आहे. स्वतःची गँग घेऊन ते फिरत आहेत आणि पक्षात त्यांनाच हवे ते निर्णय घेतले जात आहेत,” असा आरोप दमानिया यांनी केला.
Manoj jarange : “दिल्लीकडे मराठ्यांचा मोर्चा निघालाच तर सरकार हादरेल”
यावेळी त्यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पक्षातील भूमिकेवरही भाष्य केले. “प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना त्यांच्या स्वतःच्याच पद्धतीने उत्तर मिळत आहे. पक्षाच्या नव्या यादीत त्यांची नावे मागे पडली आहेत. त्यांना का बाजूला ठेवले, हे पक्ष नेतृत्वालाच माहीत असेल. भुजबळांनाही बाहेर ठेवल्याचे ऐकून बरे वाटले,” असा टोला त्यांनी लगावला. पार्थ पवार सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील गणित सांभाळत असल्याने पक्षात धूसफूस वाढल्याचा दावाही त्यांनी केला.
सरन्यायाधीशांनी केलेल्या ‘झुरळ’ या उल्लेखावरही अंजली दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली. “हे विधान ऐकून मला धक्का बसला. मी स्वतः झुरळ असल्याचे ट्विट केले आहे. सरन्यायाधीश मला झुरळ म्हणत असतील तर तो माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे. सत्ताधारी सध्या विचित्र पद्धतीने वागत आहेत आणि हे सगळे प्रकार संविधानाच्या विरोधात आहेत. त्यांनी याबद्दल माफी मागायला हवी,” असे त्या म्हणाल्या.
मुंढवा जमीन घोटाळ्यावर बोलताना दमानिया यांनी अत्यंत गंभीर आरोप केले. “मी या घोटाळ्याचा खुलासा केला. पण पार्थ पवार यांचे नाव कुठेच समोर येत नाही. हे सर्व भाजप आणि सुनील तटकरे गटाचे षडयंत्र आहे. चार्जशीटमध्ये दिग्विजय पाटील यांचे नाव पुढे आणले गेले, मात्र खरा सूत्रधार पार्थ पवारच आहेत. दिग्विजय पाटील हे फक्त एक टक्का भागीदार आहेत, तर पार्थ पवार ९९ टक्के भागीदार आहेत,” असा दावा त्यांनी केला. या प्रकरणातील चार्जशीटमध्ये मोठ्या चुका झाल्याचाही आरोप त्यांनी केला.
यावेळी त्यांनी अशोक खरात प्रकरणावरही सरकार आणि प्रशासनावर निशाणा साधला. “अशोक खरात प्रकरणात काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद आहे. आयजी कराळे यांच्यावर गंभीर आरोप आहेत. हा सुमारे ४०० कोटी रुपयांचा ट्रान्सपोर्ट घोटाळा आहे. भांडे पाटील यांनी अशोक खरातला तब्बल १४३ फोन कॉल्स केले होते. ते कशासाठी? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आयजी कराळे यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे,” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
अंजली दमानिया यांच्या या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा अंतर्गत वाद चव्हाट्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पार्थ पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या गंभीर आरोपांना काय उत्तर दिले जाते, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








