prasad-lad-manoj-jarange-maratha-reservation-meeting-antarwali-maharashtra-politics : मराठा आरक्षणावर पुन्हा राजकीय खलबतं;
Antarwali sarati : राज्यातील मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा तापू लागला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ३० मेपासून आमरण उपोषणाचा इशारा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी अंतरवली येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत चर्चा केली. या भेटीत मराठा आरक्षण, कुणबी प्रमाणपत्र, शिष्यवृत्ती, गुन्हे मागे घेणे आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. “हा प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ असून दूत म्हणून काम करेल,” असे सांगत प्रसाद लाड यांनी आंदोलनाचा मार्ग संवादातून सोडवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली.
या भेटीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये प्रसाद लाड थांबले असताना काही जणांनी हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. यापूर्वी त्यांच्या पीएला धमकीचा फोन आल्याची माहितीही समोर आली होती. या प्रकरणी पोलिसांनी योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतरही प्रसाद लाड यांनी अंतरवली येथे जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली.
Petrol Price hike : ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून पेट्रोल पंपवर ‘मेलोडी चॉकलेट’चे वाटप
चर्चेदरम्यान प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे कौतुक करत मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी मोठा लढा उभारल्याचे म्हटले. “गेल्या सत्तर वर्षांत जे अनेकांना करता आले नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी केले,” असे सांगत त्यांनी फडणवीस यांच्याविषयीचा गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले. “मी भाऊ म्हणून आलो आहे. जातीसाठी माती खायलाही तयार आहे. तुमच्या मागण्या सरकारदरबारी मांडून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करेन,” असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रसाद लाड यांनी धमकीच्या प्रकारावरही भाष्य केले. “मला आणि माझ्या कुटुंबाला धमक्या देण्यात आल्या, आईवरून शिवीगाळ करण्यात आली. मात्र मी घाबरणार नाही. समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत,” असे ते म्हणाले. “आम्ही दोघे भाऊ आहोत, आमच्यात संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनोज जरांगे पाटील यांनीही या चर्चेदरम्यान सरकार आणि प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “मुख्यमंत्री आमच्या जातीचे नसतानाही त्यांनी आरक्षण दिले, हे आम्ही मान्य करतो. पण प्रमाणपत्र वितरणात अडथळे का आणले जात आहेत?” असा सवाल त्यांनी केला. “फडणवीस साहेबांनी गोरगरिबांची मने जिंकली पाहिजेत. अधिकारी प्रमाणपत्र देत नसतील तर त्याला सरकार जबाबदार आहे,” असेही ते म्हणाले.
Akola Shivsena : अकोला जिल्ह्यात शिंदे शिवसेनेची धुरा कोणाच्या खांद्यावर?
जरांगे यांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर ठाम भूमिका मांडली. मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना २९ मेपूर्वी कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सातारा-कोल्हापूरसह विविध संस्थानांसाठी शासन निर्णय काढावा, आंदोलनातील गुन्हे मागे घ्यावेत, सारथीच्या योजना पुन्हा सुरू कराव्यात, महामंडळाचे परतावे तातडीने वितरित करावेत, तसेच स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करावे, अशा प्रमुख मागण्या त्यांनी सरकारसमोर ठेवल्या.
यावेळी त्यांनी उपोषणाबाबतही भूमिका स्पष्ट केली. “प्रसाद लाड यांच्यावर विश्वास ठेवला आहे. त्यांच्या माध्यमातून सरकार सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. लाड भाऊंमुळे मला उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, अशी आशा आहे,” असे ते म्हणाले. तसेच “मराठा समाजाने अडीच ते तीन वर्ष शांततेने आंदोलन केले आहे. समाजाला गालबोट लागेल असे कुणीही वागू नये,” असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, या भेटीनंतर मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापले असून सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पुढील काही दिवसांत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
_








