RTO gang active in vidarbha, Anil Deshmukh claims : कारवाई न झाल्यास युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा जनआंदोलनाचा एल्गार
Nagpur नागपूर शहरासह संपूर्ण विदर्भात आरटीओ (RTO) विभागाच्या नावाखाली काही दलाल आणि वसुली एजंटांकडून वाहनचालक, व्यावसायिक वाहनमालक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक सुरू असल्याचा खळबळजनक आरोप युवक राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी केला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्याचे माजी गृहमंत्री व आमदार अनिल देशमुख यांनी थेट परिवहन विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून या संपूर्ण रॅकेटची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केल्याने परिवहन वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शैलेंद्र तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर व विदर्भातील विविध सीमावर्ती तपासणी नाके आणि महामार्गांवर वाहनांची एंट्री, ओव्हरलोडिंग तसेच व्यावसायिक वाहनांची तपासणी आदींच्या नावाखाली काही दलाल आणि एजंटांचे रॅकेट खुलेआम बेकायदेशीर वसुली करत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शासनाची प्रतिमा तर मलिन होत आहेच, शिवाय सर्वसामान्य वाहनचालक, व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट जगतात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. RTO विभागाच्या नावावर सुरू असलेले हे अवैध वसुलीचे रॅकेट अत्यंत गंभीर असून, यामुळे जनतेची मोठी आर्थिक पिळवणूक होत असल्याने या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि बेकायदेशीर वसुली करणाऱ्या दलालांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्या पत्रात केली आहे.
Uddhav thackeray : बच्चू कडूंला “घरी बोलावून मंत्री केलं, तीच चूक ठरली”
या प्रकरणात परिवहन विभागाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर युवक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपूरसह संपूर्ण विदर्भात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शैलेंद्र तिवारी यांनी प्रशासनाला दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांची लूट आणि भ्रष्ट यंत्रणेचे संरक्षण आम्ही कदापि सहन करणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे. या पत्रव्यवहारामुळे आरटीओ विभागातील कथित भ्रष्टाचार आणि दलालीचा मुद्दा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, आता शासन आणि परिवहन विभाग यावर काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे.








