व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative Election : युवा स्वाभिमानने कसली कंबर, महायुतीकडे जागेची मागणी!

Legislative Election : युवा स्वाभिमानने कसली कंबर, महायुतीकडे जागेची मागणी!

Yuva Swabhiman to demand for Amravati legislative candidature at Mahayuti : चौघे इच्छुक स्पर्धेत, कोअर कमिटी बैठकीत ठाम भूमिका

Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने हालचाली सुरू केल्यानंतर आता महायुतीतील घटक पक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पार्टीनेही या जागेवर अधिकृत दावा ठोकला आहे. शुक्रवारी पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीकडून ही जागा युवा स्वाभिमान पार्टीलाच मिळावी, अशी ठाम भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.

बैठकीदरम्यान पक्षातील चार प्रमुख नेत्यांनी विधान परिषद निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत कोअर कमिटीकडे उमेदवारीसाठी अर्ज सादर केले. यामध्ये सुनील राणा, उपमहापौर सचिन भेंडे, डॉ. अविनाश चौधरी आणि संजय भारसाकळे यांचा समावेश आहे. या चौघांनीही उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत हालचाली सुरू केल्याने युवा स्वाभिमानमध्ये चुरस वाढली आहे. आता पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Legislative elections : अनिल अग्रवाल यांचे दिल्ली-मुंबईत लॉबिंग; देशमुखांचाही दावा मजबूत

कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अमरावती मतदारसंघातील राजकीय समीकरणे आणि पक्षाची ताकद यावर सविस्तर चर्चा केली. ग्रामीण तसेच शहरी भागात गेल्या अनेक वर्षांपासून युवा स्वाभिमान पार्टीने जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष केला असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

मनपा, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये पक्षाकडे प्रभावी मतदारसंख्या असल्याने विजयाचे गणित आपल्या बाजूने राहू शकते, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच युवा स्वाभिमान पार्टी ही महायुतीची विश्वासू सहयोगी राहिली असून, पक्षाला संधी दिल्यास कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल आणि त्याचा थेट फायदा महायुतीलाच होईल, असेही बैठकीत नमूद करण्यात आले.

Anil Deshmukh : विदर्भात RTO च्या नावाखाली ‘वसुली गँग’; माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे थेट परिवहन सचिवांना पत्र

“युवा स्वाभिमान पार्टीने नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडले आहेत. अमरावतीच्या विकासासाठी विधान परिषदेत पक्षाचे प्रतिनिधित्व आवश्यक आहे,” असे मत बैठकीत उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले. बैठकीच्या शेवटी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी युवा स्वाभिमानच्या मागणीचा सकारात्मक विचार करावा आणि हा मतदारसंघ पक्षाला सोडावा, अशी सामूहिक अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

error: Content is protected !!